(म्हणे) ‘पाकिस्तानी सैन्याचा लोकशाहीवर विश्‍वास !’ – पाक सैन्य

पाकिस्तानी सैन्याने देशात सैन्याचे शासन लागू करण्याचे वृत्त फेटाळले !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आमचा लोकशाहीवर विश्‍वास असून पुढेही आम्ही लोकशाहीचे समर्थन करत राहू, असे पाकच्या सैन्याने देशात मार्शल लॉ (सैन्याचे शासन) लागू करण्यावरून चालू असलेल्या चर्चेवर म्हटले आहे. पाकच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी पाकमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हे विधान केले आहे. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकच्या सैन्याच्या आदेशामुळे अटक करण्यात आल्याच्या आरोपातून खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देशात हिंसाचार करण्यात आला. सैन्याच्या मुख्यालयावर आक्रमण करण्यात आले. अनेक सैन्याधिकार्‍यांची निवासस्थाने लुटण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर देशात मार्शल लॉ लागू होण्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत.

मेजर जनरल चौधरी यांनी पाकमधील अराजकतेमुळे सैन्याधिकार्‍यांनी त्यागपत्रे दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. ते म्हणाले की, अनेक जण देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र सैन्यदल प्रमुख मुनीर यांच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटितपणे काम करत आहे. सैन्यामध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र एक स्वप्नच बनून राहील.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानी सैन्याचा विनोद ! पाकिस्तानमध्ये लोकशाहीपेक्षा सैन्याशाहीच सर्वाधिक काळ राहिलेली आहे. त्यामुळे आताही तीच स्थिती निर्माण होणार, यात पाकिस्तान्यांनाही शंका राहिलेली नाही !