टोकियो – जपानमध्ये लोकांची धर्मावरील श्रद्धा सातत्याने घटत आहे. त्यासाठी अनेक धार्मिक संघटनांचा राजकारणाशी असलेला संबंध आणि त्यांच्याकडून झालेले घोटाळे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. टोकियोतील त्सुकीजी होंनागजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनुमाने १ सहस्र ६०० लोकांना, ‘तुमच्या धर्मावरील श्रद्धेत काही पालट झाला का?’, असे विचारण्यात आले. त्या वेळी ३९.७ टक्के लोकांनी सांगितले, ‘आमचा धर्मावरील विश्वास आधीपेक्षा अल्प झाला आहे.’ १८ ते ४९ वयोगटांतील बहुतांश महिलांमध्ये धर्माप्रती नकारात्मक विचार असल्याचे आढळून आले आहे. अनुमाने ५० टक्के महिलांनीही ‘धर्मावरील आमचा विश्वास आधीपेक्षा अल्प झाला आहे’, असे सांगितले. ६० वर्षांहून अल्प वयाचे बहुतांश पुरुष आणि महिला यांना वाटते की, त्यांच्याकडे बौद्ध विहारात जाण्याचे कोणते कारण नाही.