हणजूण येथील ‘हाऊस ऑफ चापोरा’ या उपाहारगृहावर गोवा पोलिसांची धाड

उपाहारगृहात अमली पदार्थांचा व्यवहार चालत असल्याचा पोलिसांना संशय

हणजूण, ६ मे (वार्ता.) – येथील ‘हाऊस ऑफ चापोरा’ या उपाहारगृहात अमली पदार्थांचा व्यापार चालत असल्याच्या संशयावरून ६ मे या दिवशी म्हापसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली या उपाहारगृहावर पोलिसांनी धाड घातली. या धाडीमध्ये मिळालेले पदार्थ रासायनिक विश्‍लेषण करण्यासाठी पाठवण्यात आले असून याविषयीच्या अहवालात त्या पदार्थांमध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे जिवबा दळवी यांनी सांगितले. अमली पदार्थविषयक एका प्रकरणामध्ये हणजूण पोलिसांनी सूरज तोडी (२९ वर्षे) आणि काली नाईक (५० वर्षे) या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी ‘हाऊस ऑफ चापोरा’ या उपाहारगृहात अमली पदार्थांचा व्यापार चालतो’, अशी माहिती दिली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या उपाहारगृहावर धाड घातली.

(सौजन्य : In Goa 24×7)

यापूर्वी २८ एप्रिल, २ मे आणि ५ मे या दिवशी ‘नार्कोटिक कंट्रोल ब्युरो’ने गोव्यात धाडी घालून अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे उद्ध्वस्त केले होते. २८ एप्रिलला मांद्रे येथे छापा टाकून अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या रशियाच्या ऑलिंपिकपटू आणि रशियाचे माजी पोलीस अधिकारी यांना कह्यात घेतले होते. या कारवाईत आकाश नावाच्या एका स्थानिकाला कह्यात घेण्यात आले होते. २ मे या दिवशी ‘एन्.सी.बी.’ने हणजूण येथे गुप्तपणे कार्यरत असलेल्या ‘एल्.एस्.डी.’ या अमली पदार्थांची निर्मिती करणार्‍या प्रयोगशाळेवर कारवाई केली. या कारवाईत विविध प्रकारचे सुमारे २५ लाख १७ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले होते. त्यानंतर ५ मे या दिवशी दाबोळी विमानतळावर केनियाच्या नागरिकाकडून सुमारे १ किलो कोकेन (बाजारमूल्य ५ कोटी रुपये) कह्यात घेतले होते. या प्रकरणी नवी देहली येथे एका नायजेरियाच्या नागरिकाला अटक करण्यात आली होती.