मंदिर-संस्‍कृती रक्षणासाठी संघटितपणे करावयाच्‍या कृती

१. मंदिरांच्‍या प्रतिनिधींचे स्‍थानिक संघटन करणे

हे एक महत्त्वाचे उद्दिष्‍ट आपणा सर्वांचे असले पाहिजे. यासाठी जिल्‍ह्यातील मंदिरांचे विश्‍वस्‍त, पुजारी संघ, हिंदु संघटनांचे कार्यकर्ते, विविध संप्रदाय, आखाडे आदींचे प्रमुख, स्‍थानिक संत, मंदिर-रक्षणासाठी कार्य करणारे अधिवक्‍ता, तसेच समाजातील प्रतिष्‍ठित व्‍यक्‍ती यांच्‍या नियमित बैठकांचे आयोजन करता येईल. या बैठकांच्‍या माध्‍यमातून निर्माण होणार्‍या संघटनातून आपल्‍या क्षेत्रात अशा प्रकारचा कोणताही आघात होत असल्‍यास त्‍या विरोधात कृती करण्‍यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

श्री. चेतन राजहंस

२. मंदिरविरोधी घटनांमध्‍ये आंदोलन करणे

जेव्‍हा मंदिरविरोधी घटना घडतात, तेव्‍हा जिल्‍ह्यातील मंदिर प्रतिनिधींनी एकत्रित येऊन आंदोलन करणे, जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देणे, निषेध सभा घेणे इत्‍यादी कृती करायला हव्‍यात. उदाहरणार्थ –

२ अ. मंदिरांतील चोर्‍या आणि मूर्तीभंजन : या घटनांमध्‍ये बर्‍याचदा समाजातील धर्मांध प्रवृत्ती असतात, हे सिद्ध झाले आहे. हिंदूंच्‍या श्रद्धास्‍थानांवर आघात करणे, हा त्‍यांचा उद्देश असतो. अशा प्रसंगी ज्‍या मंदिराच्‍या संदर्भात ही घटना घडली आहे, त्‍यांच्‍या साहाय्‍याला अन्‍य मंदिरांनी उभे रहाणे आवश्‍यक ठरते.

२ आ. मंदिरांच्‍या भूमीवरील अतिक्रमण : काही मंदिरांच्‍या भूमीवर इस्‍लामिक प्रवृत्तींकडून अवैध अतिक्रमण केलेले आढळते. काही मंदिरांच्‍या भूमींवर सरकारी विभागांनीच कार्यालये बांधल्‍याचेही घडले आहे. अशा प्रसंगी जी मंदिरे एकाकी लढा देत असतात, त्‍यांना साहाय्‍य करणे, हे मंदिर प्रतिनिधींच्‍या दृष्‍टीने धर्मबंधुत्‍व ठरणार आहे.

२ इ. प्रशासनाद्वारे मंदिरे पाडणे : काही वेळा स्‍थानिक प्रशासनाद्वारे मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडली जातात. काही वेळा रस्‍ता रुंदीकरणाच्‍या नावाखाली मंदिरे तोडण्‍यात येतात. हेही एक प्रकारचे मंदिरांवरील श्रद्धाभंजन करणारे संकट आहे. अशा प्रसंगी संबंधित मंदिराच्‍या साहाय्‍याला धावून जाणे, हे आपले धर्मकर्तव्‍यच आहे.

३. मंदिरांच्‍या सरकारीकरणाला विरोध करा !

महाराष्‍ट्र राज्‍यस्‍तरावर विचार करतांना ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करा’, ही मागणी आपण संघटितपणे पुढे घेऊन जाऊ शकतो.

४. धर्मसंस्‍थापनेच्‍या कार्यात सहभागी व्‍हा !

मंदिर-संस्‍कृती रक्षणाची चळवळ ही धर्मरक्षणाची चळवळ आहे. मंदिरांमुळे समाजात धर्मभावना वर्धिष्‍णू होतात. त्‍यामुळे यात सर्व मंदिर प्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे आहे. सध्‍या सर्वत्र धर्माला ग्‍लानी आलेली दिसत असतांना धर्मसंस्‍थापनेसाठी आपल्‍याला पुढाकार घ्‍यावा लागेल.

– श्री. चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था. (२.२.२०२३)