कुस्तीपटूंच्या आडून…!

आंदोलनात सहभागी झालेले कुस्तीपटू

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतच चालले आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ३ मेच्या रात्री कुस्तीपटू आणि पोलीस यांच्यातील चकमकीत काही कुस्तीपटू घायाळ झाले. ‘मद्यधुंद पोलिसांनी अचानक येऊन आमच्यावर आक्रमण केले, तसेच आम्हाला मारहाण आणि शिवीगाळ केली’, असा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. न्यायाऐवजी अन्याय होणे, अशी या कुस्तीपटूंची सध्या गत झाली आहे. जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीवर गंभीर आरोप होतात, तेव्हा त्याने पदाचे त्यागपत्र देणे, ही एक नैतिकतेला धरून केलेली कृती असते. बृजभूषण शरण सिंह यांनी असे काहीही केले नाही. अशा वेळी सरकारने हस्तक्षेप करून संबंधितांना त्यागपत्र देण्यास भाग पाडणे आवश्यक असते. तसेही झाले नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयी लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली. त्याही पुढे जाऊन पोलिसांनी या प्रसंगी दाखवलेली उदासीनता चीड आणणारी आहे. सिंह यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे; मात्र त्यांना चौकशीसाठी अजूनही का बोलावण्यात आले नाही ? यावरून ‘पोलीस सिंह यांना वाचवू पहात आहेत का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. ही झाली घटनेची एक बाजू ! दुसर्‍या बाजूनेही या प्रकरणाकडे पहाणे महत्त्वाचे आहे. या आंदोलनाच्या आडून जे देशविघातक घटक यात घुसले आहेत, त्यावरून या आंदोलनाच्या हेतूविषयी शंका निर्माण होते. सामाजिक संकेतस्थळांवरही या पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंवर टीका केली जात आहे. ‘कुस्तीपटूंना अनेकांकडून मिळणारा पाठिंबा पहाता त्यांच्या बँकेतील खाती तपासायला हवीत, त्यात पैशांची अचानक वाढ झालेली पहायला मिळेल’, असे काहींनी म्हटले आहे. ‘बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट होऊन गुन्हा नोंद करण्याची कारवाई झालेली आहे. असे असतांना आंदोलनाच्या माध्यमातून देशाला विनाकारण ढवळून काढण्याचा आटापिटा या कुस्तीविरांनी आतातरी थांबवायला हवा’, असे मतही काहींनी नोंदवले आहे. ‘शेतकरी आंदोलनाप्रमाणे आपल्याला प्रसिद्धी मिळत नसल्याने आंदोलनकर्तेच आक्रमक झालेले नसतील कशावरून ?’, अशीही टीका होत आहे. थोडक्यात काय, तर कुस्तीपटू एकप्रकारे भावनिक वातावरण बनवून समर्थनाचे वातावरण बनवत असले, तरी या आंदोलनामागील सत्यतेचा शोध घेणेही तितकेच आवश्यक आहे.

आंदोलनामागील सत्य !

‘इंडियन ऑलिंपिक असोसिएशन’च्या अध्यक्षा पी.टी. उषा यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. खरेतर मागील आठवड्यात त्यांनी आंदोलनावर टीका केली होती आणि आता मात्र आंदोलनकर्त्यांना त्या भेटायला गेल्या. याला काय म्हणावे ? पोलिसांच्या आक्रमणानंतर कुस्तीपटूंनी म्हटले, ‘‘हाच दिवस पहाण्यासाठी आम्ही देशासाठी पदक जिंकले होते का ? आम्ही आमची सर्व पदके सरकारला परत करू.’’ कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनीही केंद्र सरकारला सर्व पदके परत करणार असल्याचे सांगितले आहे. बरेच कष्ट घेऊन यश मिळते. पदकांच्या माध्यमांतून हे यश कुस्तीविरांना गवसणी घालत असते. मग अशी पदके परत करणे सोपे आहे का ? गेल्या काही वर्षांपासून भारतात ‘पुरस्कारवापसी’ची टूम अधूनमधून येत असते. जरा मनासारखे झाले नाही की, दिला पुरस्कार सरकारकडे ! आतापर्यंत अनेक लेखक, साहित्यिक, पत्रकार, अभ्यासक यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले आहेत. ही सर्व मंडळी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, हिंदुद्वेषी या पठडीतील असतात. अशांनी ‘पुरस्कारवापसी’चे ढोंग करून भारताचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता ‘पुरस्कारवापसी’ची लाट पुन्हा येणे, ही साधी गोष्ट नाही. कुठेतरी पाणी मुरत आहे, हे निश्चित !

सरकारविरोधी षड्यंत्र ?

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आंदोलनस्थळी भेट

कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍यांची संख्या वाढत आहे. सकाळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आंदोलनस्थळी भेट देतात, तर दुपारी ‘आप’चे संस्थापक आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तेथे पोचतात. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषीविषयीच्या ३ कायद्यांच्या विरोधात देहली येथे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या कथित आंदोलनाला पाठिंबा देणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही कुस्तीपटूंची भेट घेतली. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचाही पाठिंबा आहे. त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे. त्यांचे ‘पी.एफ्.आय.’शी (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी) संबंध असल्याचे काही पुरावे सापडले आहेत. ‘पी.एफ्.आय.’ ही संघटना देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे केंद्रशासनाच्या अन्वेषणात सिद्ध झाले आहे. अशा संघटनेकडूनही या आंदोलनाला पैसा पुरवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसने आंदोलनप्रकरणी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘या आपल्या देशाच्या मुली आहेत. त्यांचा मान जपला पाहिजे. त्यांनी आपल्याला अनेक पदके मिळवून दिली आहेत; पण गृहमंत्री अमित शहा यांचे पोलीस त्यांच्याशी गैरवर्तन करत आहेत. मोदीजी, असा अन्याय का करता ?’ काँग्रेसच्या ट्वीटमधून भाजपविरोध उघड होतो. ‘कुस्तीपटूंच्या आंदोलनाला भेटी देणार्‍या देशविरोधी शक्तींची पार्श्वभूमी पहाता हे सरकारविरोधी रचले जाणारे पूर्वनियोजित षड्यंत्र नसेल कशावरून ? हा प्रकार म्हणजे भारताला अस्थिर करण्याचा कटच आहे. हा सर्व प्रकार थांबवायचा असेल, तर सरकारने महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे. अशानेच कुस्तीपटू आणि सामान्य जनता यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल.