छत्रपती संभाजीनगर येथील घरकुल घोटाळ्‍यातील चुकीला क्षमा नाही, कठोर कारवाई करू ! – जी. श्रीकांत, आयुक्‍त, महापालिका

डावीकडून जी. श्रीकांत, डॉ. अभिजित चौधरी

छत्रपती संभाजीनगर – घरकुल घोटाळ्‍याविषयी सर्वप्रथम पूर्ण माहिती घेतली जाईल. मी वर्तमानपत्रात याविषयी वाचले, तेवढेच मला माहिती आहे. या प्रकरणात ज्‍यांनी चुका केल्‍या असतील, त्‍यांना क्षमा केली जाणार नाही. जे चुकीचे काम करतील त्‍यांची कुठल्‍याही प्रकारे गय केली जाणार नाही. उलट त्‍यांच्‍यावर आतापेक्षा अधिक कठोर कारवाई करण्‍यात येईल. या सर्व घोटाळ्‍याच्‍या चौकशीचा पवित्रा कायम राहील, असे प्रतिपादन महापालिकेचे नूतन आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी येथे केले. प्रभारी आयुक्‍त जिल्‍हाधिकारी आस्‍तिककुमार पांडेय यांनी ३ मे या दिवशी आयुक्‍तपदाची सूत्रे जी. श्रीकांत यांच्‍या हाती सोपवली. त्‍यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जी. श्रीकांत म्‍हणाले की, महापालिकेत कोण काय काम करते ? याचा अंदाज घ्‍यायला मला अधिक काळ लागणार आहे. माझ्‍यासमवेत काम करणार्‍या अधिकार्‍यांना मी ‘शॉर्ट टर्म’, ‘मीडियम टर्म’ आणि ‘लाँग टर्म व्‍हिजन’ (अल्‍प, मध्‍यम आणि अधिक कालावधीचे उद्दीष्‍ट) निश्‍चित करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. शहरासाठी तुम्‍ही काय करणार ? हे मला सांगा. ५ मंत्री आणि एक विरोधी पक्षनेते या शहराला मिळाले आहेत. त्‍यामुळे शहराच्‍या विकासासाठी सुवर्णकाळ आहे. मी शहराच्‍या विकासासाठी ४ गोष्‍टी सांगण्‍यापेक्षा या शहरासाठी मी काय करणार हे अधिकार्‍यांनी सांगितले, तर काम अधिक चांगले होईल. शहराच्‍या विकासाचा दृष्‍टीकोन नसलेल्‍यांनी निघून गेले, तरी चालेल, असे मी अधिकार्‍यांना स्‍पष्‍टपणे सांगितले. ज्‍यांना काही काम करायचे आहे, तेच माझ्‍यासमवेत असतील. नाहीतर मी कारवाई करण्‍यापेक्षा ते स्‍वत:हूनच बाजूला झालेले कधीही चांगले, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

जी. श्रीकांत पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक गोष्‍टीचा अभ्‍यास करूनच पुढे निर्णय घेण्‍यात येतील. शहराचा एक नागरिक म्‍हणून महापालिकेचा कारभार करतांना नागरिकांना भेडसावणार्‍या अडीअडचणी आणि समस्‍या यांचा अभ्‍यास केला जाईल. शहरातील पाण्‍याचा प्रश्‍न गंभीर असून तो सोडवण्‍यासाठी प्राधान्‍याने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. प्रतिदिन पाणी कसे देता येईल ? रस्‍त्‍यांची कामेही हाती घेतली जातील.


‘घरकुल’ घोटाळा उघड करणारे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांचे स्‍थानांतर !

छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्‍तपदी जी. श्रीकांत !

छत्रपती संभाजीनगर – येथील घरकुल योजनेच्‍या निविदेतील घोटाळ्‍याच्‍या चौकशीमुळे चर्चेत आलेले छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांचे ९ मासांतच स्‍थानांतर झाले आहे. वस्‍तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) विभागाचे आयुक्‍त जी. श्रीकांत यांचे महापालिकेच्‍या आयुक्‍तपदी, तर डॉ. चौधरी यांची ‘जी.एस्.टी.’च्‍या छत्रपती संभाजीनगर विभागाच्‍या आयुक्‍तपदी स्‍थानांतर करण्‍यात आले आहे. गेल्‍या २ मासांपासून डॉ. चौधरी यांच्‍या स्‍थानांतरासाठी सत्ताधारी पक्षातील काही स्‍थानिक नेत्‍यांचे प्रयत्न चालू होते. त्‍यांच्‍या आग्रहानंतर अखेर मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांनी चर्चेतून डॉ. चौधरी यांच्‍या स्‍थानांतर आदेशावर २ मे या दिवशी शिक्‍कामोर्तब करत स्‍थानांतराचे आदेश जारी केले.

डॉ. चौधरी यांची २२ जुलै २०२२ या दिवशी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्‍या आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्‍यात आली होती. पदभार हाती घेताच त्‍यांनी येथील प्रत्‍येक विकास कामांचा बारकाईने अभ्‍यास चालू केला. त्‍यांनी स्‍मार्ट सिटीतील ३१७ कोटी रुपयांच्‍या रस्‍ते कामांत लक्ष घातले. स्‍मार्ट सिटीकडे निधीच शिल्लक नसल्‍याने त्‍यांनी रस्‍त्‍यांची कामे थांबवली होती. आता या रस्‍ते कामांसाठी ‘स्‍मार्ट सिटी बस’ची मुदत ठेव (एफडी) तोडून ६६ रस्‍त्‍यांची कामे केली जात आहेत.

त्‍याचसमवेत पंतप्रधान आवास योजनेच्‍या घरकुल प्रकल्‍पांतील अनियमितताही डॉ. चौधरी यांच्‍यामुळेच उघडकीस आली. त्‍यांच्‍या अभ्‍यासूवृत्तीमुळे महापालिकेतील संचिकांचा प्रवास मंदावल्‍याची ओरड अधिकारी वर्गातून केली जात होती. त्‍याचसमवेत सत्ताधारी पक्षातील काही स्‍थानिक राजकारण्‍यांची आणि त्‍यांच्‍या मर्जीतील पदाधिकार्‍यांची कामे रोखली गेल्‍याने डॉ. चौधरी यांच्‍या स्‍थानांतरासाठी विशेष प्रयत्न चालू होते. अखेर डॉ. चौधरी हे विदेश दौर्‍यावर असतांना त्‍यांचे स्‍थानांतर करण्‍यात आले आहे.