शेगाव (जिल्हा बुलढाणा) – राज्यातील मोठे देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानकडून वर्ष २००१ मध्ये तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून भूमी ‘लीझ’वर (भाड्याने) घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या पर्यटन अन् धार्मिक केंद्राची ३५० एकर जागेत उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढले होते; पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानने ‘आनंद सागर’ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आता ‘आनंद सागर’मधील केवळ आध्यात्मिक केंद्र ४ मेपासून सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत निःशुल्क चालू झाले आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी इतरही काही सोयीसुविधा या ठिकाणी चालू होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराजांच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
‘आनंद सागर’ चालू झाल्यानंतर त्याची भव्यता, दिव्यता बघून या ठिकाणी देशातील लाखो भाविक आणि पर्यटक प्रतिदिन ‘आनंद सागर’ची आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी येऊ लागले. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच गेली. खरेतर हा पडीक भूमीचा भाग शेगाव शहरालगतचा होता. त्यामुळे संस्थानने सरकारकडून ही जागा भाडेतत्त्वावर घेऊन विकसित करून अतिशय भव्य असे ‘आनंद सागर’ त्या भूमीवर उभारले होते; मात्र काही कारणाने ‘आनंद सागर’ बंद करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता.
यातील प्रसिद्ध अशी ‘मिनी ट्रेन’, ‘चिल्ड्रन पार्क’, ‘एम्युजमेंट पार्क’ हे सर्व काढून टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ‘आनंद सागर’मधील केवळ आध्यात्मिक केंद्रातील मंदिरात दर्शन आणि इतर सुविधा यांचाच लाभ भक्तांना मिळणार आहे.