गोव्यात आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद

भारत-पाकिस्तान चर्चेकडे अनेकांचे लक्ष

पणजी, ३ मे (वार्ता.) – गोव्यात ४ मेपासून ‘शांघाय सहकार्य संघटना’ (‘एस्.सी.ओ.’) राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसांच्या परिषदेला प्रारंभ होणार आहे. या परिषदेचे यजमानपद भारत भूषवत आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशिया यांच्यासह इरत सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. परिषदेचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर हे भूषवणार आहेत. परिषदेला चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव यांचीही उपस्थिती लाभणार आहे. ‘एस्.सी.ओ.’ ही युरेशियन (युरोप आणि आशिया या खंडांतील देशांची) राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण संस्था आहे.

परिषदेला सकाळी १०.१५ वाजता प्रारंभ होणार आहे. या परिषदेमध्ये तालीबान राजवटीखाली असलेले अफगाणिस्तान हे आतंकवादाचे निर्मिती केंद्र बनत असल्याची भीती, तसेच नागरिकांची सुरक्षा, प्रादेशिक विषय आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. येत्या जुलैमध्ये चीन आणि रशिया यांचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीच्या पूर्वी होणारी ‘एस्.सी.ओ.’ परिषद महत्त्वाची आहे.

भारत-पाकिस्तान चर्चेकडे सर्वांचे लक्ष

परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भूत्तो ४ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता गोव्यात येत आहेत; मात्र ते गोव्यात समुद्रकिनार्‍यावर रात्रीच्या वेळी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला उपस्थित रहाणार आहेत कि नाहीत याविषयी अजून माहिती मिळालेली नाही. परिषदेत प्रामुख्याने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या होणार्‍या चर्चेकडे सर्वांचे लक्ष असेल.