नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ची आवश्‍यकता !

प्रतिकात्मक छायाचित्र

(‘सर्जिकल स्‍ट्राईक’ म्‍हणजे लक्ष्यित आक्रमण)

१. छत्तीसगडच्‍या दंतेवाडा भागामधील नक्षलवादी आक्रमणात १० सैनिकांना वीरमरण !

छत्तीसगडच्‍या दंतेवाडा भागामधील नक्षलवादी आक्रमणात १० सैनिकांना वीरमरण

‘नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्‍या दंतेवाडा भागात घडवून आणलेल्‍या बाँबस्‍फोटात जिल्‍हा राखीव दलाचे १० सैनिक वीरगतीला प्राप्‍त झाले, तसेच एका वाहनचालकाचा मृत्‍यू झाला. (पूर्वी नक्षली कारवायांमध्‍ये असतांना ज्‍यांनी आत्‍मसमर्पण करून नोकरी स्‍वीकारली, असे स्‍थानिक सैनिक) हे सैनिक त्‍यांच्‍या वाहनातून नक्षलवादविरोधी मोहीम राबवून परतत असतांना २६.४.२०२३ च्‍या दुपारी ही घटना घडली. या स्‍फोटात ५० किलो स्‍फोटकांचा वापर करण्‍यात आला होता. हे सैनिक पावसात अडकलेल्‍या सैनिकांच्‍या साहाय्‍यासाठी निघाले होते. या स्‍फोटामुळे रस्‍त्‍याला मोठा खड्डा पडला. त्‍यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात येते. यामागे नेहमीप्रमाणे ‘परकीय शक्‍तींचा हात’ किंवा ‘पाकिस्‍तानी कृत्‍य’, अशी कारणे दिली, तरी स्‍थानिक व्‍यक्‍तींचा सहभाग असल्‍याखेरीज या गोष्‍टी होणे शक्‍य नसते. हे पाकपुरस्‍कृत कृत्‍य आहे, यात कोणताही संशय नाही. पूर्वी ईदच्‍या काळात भारतीय सैनिक पाकिस्‍तानी सैनिकांवर आक्रमण करत नसत; परंतु ज्‍यांच्‍या रक्‍तात ‘देशद्रोही’पणा आहे, ते पाकडे भारतीय शूर सैनिकांवर हमखास आक्रमण करायचे. सुदैवाने वर्ष २०१४ नंतर या धोरणामध्‍ये पालट झाला आहे.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. अतिशय प्रतिकूल परिस्‍थितीत दिवसरात्र देशसेवा करणार्‍या सैनिकांचा शेवट दुर्दैवी !

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी धर्मांधांनी रामनवमीला दंगली केल्‍या आणि आपले पोलीस तथा राजकारणी त्‍यांना इफ्‍तारची मेजवानी देत बसले. आपण अनुभवातून काहीच शिकणार आहोत कि नाही ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्‍या फाळणीच्‍या वेळी स्‍पष्‍ट म्‍हणाले होते, ‘‘धर्मांधांना देशप्रेम नाही, तर त्‍यांचा पंथ प्रिय असतो.’’ तो इतिहास आपण थेट पानिपतच्‍या लढाईपर्यंत बघितला. मग आपण त्‍यांना कशाला पोसतो आहे ? यांच्‍यावर दया का दाखवतो ? सैनिकांना त्‍यांचे शौर्य गाजवायची संधी द्या ना ! नंतर झालेल्‍या अन्‍वेषणामध्‍ये २ स्‍थानिक आणि ५ पाकिस्‍तानी नागरिक यांनी हे कृत्‍य केल्‍याचे उघड झाले. भ्‍याड जिहादी वृत्ती असलेल्‍या एका धर्मांधाने आत्‍महत्‍या केली. अशा घटनांमध्‍ये स्‍थानिकांचा सहभाग असल्‍याचे सूत्र स्‍व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी उपस्‍थित करायचे. देशात गेली ७५ वर्षे राजकारण्‍यांकडून ‘आतंकवादी आक्रमणाला धर्म नसतो’, अशी मखलाशी करण्‍यात येते. अतिशय प्रतिकूल परिस्‍थितीत दिवस-रात्र देशासाठी सेवा करणार्‍या शूर सैनिकांचा शेवट अशा प्रकारे व्‍हावा, हे बघवत नाही.

३. जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद अद्यापही जिवंत !

पुंछ येथे झालेल्‍या आतंकवादी आक्रमणामध्‍ये ५ सैनिकांना नुकतीच वीरगती प्राप्‍त झाली

काश्‍मीरमधील जिहादी आक्रमणे, तसेच विविध राज्‍यांतील नक्षलवाद आटोक्‍यात आल्‍याचे केंद्र आणि विविध राज्‍य सरकारे सांगत असले, तरी ना नक्षलवाद पूर्णतः संपला ना जिहादी आक्रमणे पूर्णपणे संपली. ‘राष्‍ट्रीय रायफल्‍स’च्‍या पथकाने पुंछ (जम्‍मू-काश्‍मीर) येथे स्‍थानिक मुसलमानांसाठी इफ्‍तारची मेजवानी आयोजित केली होती. या मेजवानीचे साहित्‍य घेऊन जाणार्‍या ट्रकवरच आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्‍यामुळे येथे हे सूत्र उपस्‍थित होते की, अशा मुसलमानांना इफ्‍तारनिमित्त मेजवानी का द्यायची ? भारतीय सैनिकांवर आक्रमण करण्‍यासाठीच का ? पुंछ येथे झालेल्‍या आतंकवादी आक्रमणामध्‍ये ५ सैनिकांना नुकतीच वीरगती प्राप्‍त झाली. प्रत्‍येक वेळी राजकीय नेते हुतात्‍मा सैनिकांच्‍या अंत्‍ययात्रेत सहभागी होण्‍याचे कर्तव्‍य पार पाडतात आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना काही लाखांचे साहाय्‍य देण्‍याची घोषणा करतात. यात दुर्दैव असे की, स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही आतंकवाद आणि नक्षलवाद यांची कुकृत्‍ये चालूच आहेत.

४. नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्‍यक ! 

धाडसी आणि मुत्‍सद्दी असलेल्‍या केंद्र सरकारने पाकिस्‍तानवर ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करून जगाला भारताचा एक वेगळा परिचय करून दिला. भारतीय सैनिकांनी चिनी आक्रमणकर्त्‍यांना अतुलनीय धैर्य दाखवले, तसेच ‘ऑपरेशन गंगा’, ‘ऑपरेशन कावेरी’ अशा मोहिमा राबवून परराष्‍ट्रात प्रतिकूल परिस्‍थितीत अडकलेल्‍या भारतीय नागरिकांना सुखरूप परत आणले. देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्‍तान हा ‘भारत आमच्‍यावर कुठल्‍याही क्षणी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो. यातही दुर्दैवी पक्षीय राजकारण आणले जाते आणि एकमेकांचे उणे-दुणे काढून या आक्रमणाला केंद्र किंवा राज्‍य सरकार उत्तरदायी असल्‍याचे भासवले जाते. या घटनांना पाकिस्‍तान कसा उत्तरदायी नाही, हे ऐकावे लागते. या सर्व कारणांसाठी भारतात ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापन करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु !

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (३०.४.२०२३)