नवी मुंबईत पाणी कपातीला प्रारंभ

( संग्रहीत छायाचित्र )

नवी मुंबई – या वर्षी पाऊस विलंबाने येणार असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २८ एप्रिलपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.
‘अल-निनो’ समुद्रप्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस लांबणार आहे. पावसाचे प्रमाणही अल्प रहाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करण्याविषयी महापालिकेस सूचना दिलेल्या आहेत.

मोरबे धरण ( संग्रहीत छायाचित्र )

त्यानुसार महानगरपालिकेच्या क्षेत्राला लागणारे पाणी आणि मोरबे धरणातील सध्याचे उपलब्ध पाणी यांचा ताळमेळ राखणे आवश्यक आहे. धरणातील एकूण साठ्यातून पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करून पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिघा विभागामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेऊन रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांच्याकडील शटडाऊननुसार दिघा येथील पाणीपुरवठा बंद रहाणार आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.