आधुनिक वैद्यांचे तात्पुरते स्थानांतर करण्यावर यापुढे बंदी !

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा निर्णय !

नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चालू करण्याच्या दृष्टीने मनुष्यबळ असल्याचे दाखवण्यासाठी केले जात होते तात्पुरते स्थानांतर !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (‘नॅशनल मेडिकल कौन्सिल’च्या) वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाचे सदस्य डॉ.जे.एल्. मीना यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चालू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या वतीने पहाणी केली जाते. त्या वेळी इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांचे अशा नवीन रुग्णालयात तात्पुरते स्थानांतर करू नये’, असे परिपत्रक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने प्रसारित केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या तात्पुरत्या स्थानांतरांवर कायमचे निर्बंध घालण्याचा आदेश संभाजीनगर खंडपिठाने दिला होता. त्यानुसार राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय शिक्षण संस्थांना हे निर्देश दिले आहेत.

एस्.आय.एम्.चे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. संभाजीनगर आणि इतर जिल्ह्यांतील आधुनिक वैद्यांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थानांतर करून आयोगासमोर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय चालू करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे खोटे प्रदर्शन केले जात असल्याचा युक्तीवाद केला होता. या जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांच्या खंडपिठाने महाराष्ट्रात नवीन शासकीय वैद्यकीय रुग्णालय चालू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या पडताळणीच्या वेळी खोटे प्रदर्शन करण्यासाठी आधुनिक वैद्यांची तात्पुरत्या स्वरूपाची फेरनियुक्ती करण्यावर कायमचा प्रतिबंध लावण्याचा आदेश दिला होता.

देशभरातील आधुनिक वैद्यांमध्ये आनंदाचे वातावरण !

तात्पुरत्या पालटांमुळे विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत कार्यरत आधुनिक वैद्यांना अनेक वर्षांपासून मानसिक आणि आर्थिक त्रास होऊन अन्याय होत होता. आयोगाच्या वरील निर्णयामुळे आता आधुनिक वैद्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत असून त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तसेच अनेकांनी जलील यांचे आभारही मानले आहेत.