श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘मी शर्वरी नसून श्रीगणेशाच्या चरणांजवळील ‘मूषक’ आहे’, असा भाव ठेवणारी कु. शर्वरी कानस्कर !

सिद्धिविनायक मूर्ति

१. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना आरंभी ठेवलेला भाव आणि  गणेशचतुर्थीच्या नंतर निर्माण झालेला भाव !

‘पूर्वी मी ऋद्धिसिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘मी शर्वरी आहे आणि भक्तीभावाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आहे’, असा भाव ठेवायचे. या गणेशचतुर्थीच्या नंतर सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना गुरुदेवांच्या कृपेमुळे माझे लक्ष प्रथम मूर्तीच्या चरणांजवळील मूषकाकडे गेले आणि माझ्या मनात भाव निर्माण झाला, ‘मी शर्वरी नसून श्री मूर्तीच्या चरणांजवळील ‘मूषक’ आहे आणि सिद्धिविनायकाच्या विराट रूपाचे दर्शन घेत आहे.’

२. ‘सिद्धिविनायकाच्या चरणांजवळील ‘मूषक’ आहे’, असा भाव ठेवल्यावर शिकायला मिळालेली सूत्रे

अ. मी ‘मूषक’ असल्याचा भाव ठेवल्यामुळे मला मूषकाकडून ‘तत्परता’ आणि ‘आज्ञापालन करणे’, हे गुण शिकायला मिळाले.

आ. मूषक ज्याप्रमाणे श्री गणेशाचे चरण सोडून कुठेही जात नाही, त्याप्रमाणे मलाही गुरुदेवांचे चरण सोडून कुठेही जायचे नाही.

३. ‘मूषक म्हणजे साधकपुष्प आहे’, असे जाणवणे

मूर्तीचे दर्शन घेतांना मी तिच्या चरणी अर्पण केलेल्या फुलांकडे पाहिले. तेव्हा मला ‘मूषक म्हणजे साधकपुष्प असून ते सिद्धिविनायकाच्या चरणांवर समर्पित झाले आहे’, असे जाणवले.

४. कृतज्ञता

‘परात्पर गुरु डॉक्टर, मी असमर्थ आहे. तुम्हीच मला असा भाव ठेवायला सुचवले आणि माझ्याकडून प्रयत्न करून घेतले. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक अनुभूतीच आहे. प्रत्येक प्र्रसंगातून ‘आनंद कसा अनुभवायचा ?’, हे तुम्ही मला शिकवता. हे सर्व केवळ तुमच्या कृपेमुळेच शक्य होत आहे. हे प्रीतीस्वरूप आणि आनंदस्वरूप गुरुदेवा, मी तुमच्या कोमल चरणी कृतज्ञतेचे भावपुष्प अर्पण करते.’

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.   

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक