२९ एप्रिलला लागणार निकाल
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ११ जागांसाठी २८ एप्रिल या दिवशी मतदान झाले. यामध्ये एकूण ११ सहस्र ११० मतदारांपैकी ३ सहस्र ४१५ मतदारांनी मतदान केले आहे. एकूण ३२.३७ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीचा निकाल २९ एप्रिल या दिवशी लागणार असल्याने संचालकपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत ११ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सहकारी संस्था मतदार संघातून १ सहस्र ६२१, तर ग्रामपंचायत मतदार संघातून १ सहस्र ७९४ मतदारांनी मतदान केले.
बाजार समितीसाठी सहकार पॅनेलमधून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट शिवसेना, काँग्रेस, ठाकरे गट सेना, असे सर्वच पक्ष एकत्रित झाले होते; मात्र ३ अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक घ्यावी लागली. सहकार पॅनेलचे हेमचंद्र माने, गजानन पाटील, सुरेश कांबळे हे तीन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
सहकार पॅनेलमधून ठाकरे सेना आणि शिंदे गट यांना प्रत्येकी ४, भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी २, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला ५ जागा देण्यात आल्या आहेत.