‘फिल्मफेअर पुरस्कार’ हे अनैतिक आणि चित्रपटविरोधी ! – विवेक रंजन अग्निहोत्री

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री

मुंबई – मी अनैतिक आणि चित्रपटविरोधी ‘फिल्मफेअर पुरस्कारां’चा भाग बनू इच्छित नाही, असे वक्तव्य प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. ६८ व्या ‘फिल्मफेअर पुरस्कारां’च्या नामांकनातील ७ श्रेणींमध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला नामांकित करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी वरील विधान केले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एका मोठ्या पोस्टद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपटाच्या नामांकनांच्या अंतर्गत स्वत: अग्निहोत्री, कलाकार अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, तसेच ‘व्हिडिओ एडिटर’ शंख राज्याध्यक्ष यांची नावे अंतर्भूत करण्यात आली आहेत.

अग्निहोत्री म्हणाले की, फिल्मफेअर पुरस्कारांसाठी केवळ मोठ्या कालाकारांचा चेहराच महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच यामध्ये दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कार्यरत अन्य लोकांना कोणतेच महत्त्व दिले जात नाही. या लोकांसमवेत ‘कलाकारांचे गुलाम’ अशा प्रकारे व्यवहार केला जातो. चित्रपट निर्मात्यांना या पुरस्कारांमुळे नव्हे, तर त्यांच्या कामामुळे प्रतिष्ठा मिळत असते. या अवमानकारक व्यवस्थेला संपवले पाहिजे.

संपादकीय भूमिका

चित्रपट हे समाजाचा आरसा बनून त्याला योग्य दिशादर्शन करणारे असणे अपेक्षित असतांना त्यांच्या प्रोत्साहनार्थ देण्यात येणार्‍या पुरस्कारांची अशी दशा असेल, तर चित्रपट कधीतरी समाजहित साधतील का ?