३०.१०.२०२२ या दिवशी पू. पद्माकर होनप यांनी देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेत असतांना सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांना आलेल्‍या अनुभूती

‘वैशाख शुक्‍ल षष्‍ठी (२६.४.२०२३) या दिवशी सनातनचे सातवे संत पू. पद्माकर होनप यांना देहत्‍यागानंतर ६ मास पूर्ण होत आहेत. तेव्‍हा त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे देत आहोत.

पू. पद्माकर होनप

१. सकाळी पू. होनपकाकांचा देहत्‍याग होण्‍यापूर्वी त्‍यांचा प्राण डोळ्‍यांपर्यंत आला असल्‍याचे जाणवणे आणि देहत्‍याग होतांना त्‍यांचा प्राण डोळ्‍यांतूनच बाहेर पडल्‍याचे समजणे

मला कालपर्यंत पू. होनपकाका यांचा प्राण नाकापर्यंत आला असल्‍याचे जाणवले होते. आज (३०.१०.२०२२ या दिवशी) सकाळी पू. होनपकाकांनी देहत्‍याग करण्‍यापूर्वी मला त्‍यांचा प्राण डोळ्‍यांपर्यंत आला असल्‍याचे, म्‍हणजे त्‍यांचा देहत्‍याग आणखी जवळ आला असल्‍याचे जाणवले होते. आज दुपारी देहत्‍याग होतांना त्‍यांचा प्राण डोळ्‍यांतूनच बाहेर पडल्‍याचे त्‍यांचे सुपुत्र श्री. राम यांनी सांगितले.

२. पू. होनपकाका यांच्‍या देहत्‍यागानंतर त्‍यांचे दर्शन घ्‍यायला गेल्‍यावर माझा ‘निर्विचार’ हा नामजप आपोआप चालू झाला !

पू. होनपकाका हेही शेवटपर्यंत ‘निर्विचार’ हाच नामजप करत होते; म्‍हणून त्‍यांच्‍या देहातून त्‍या नामजपाची स्‍पंदने प्रक्षेपित होत होती आणि त्‍यामुळे माझा तोच नामजप आपोआप चालू झाला.

३. पू. होनपकाकांच्‍या खोलीत कोणत्‍याही प्रकारचा सूक्ष्मातील त्रास न जाणवता शांत वाटत होते आणि आनंदही जाणवत होता.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

४. पू. होनपकाकांच्‍या देहावरून त्‍यांच्‍या चरणांपासून डोक्‍यापर्यंत हात फिरवल्‍यावर जाणवलेली स्‍पंदने !

पू. होनपकाकांच्‍या देहावरून साधारण ५ सें.मी. अंतरावरून त्‍यांच्‍या चरणांपासून डोक्‍यापर्यंत हात फिरवल्‍यावर प्रथम त्‍यांच्‍या चरणांतून शक्‍तीची स्‍पंदने वेगाने प्रक्षेपित होत असल्‍याचे जाणवले. जसे त्‍यांच्‍या मुखाकडे माझा हात जात होता, तशी मला शक्‍तीची स्‍पंदने न्‍यून होऊन प्रथम भावाची, त्‍यानंतर आनंदाची आणि शेवटी डोक्‍याच्‍या वर सहस्रारचक्रावर शांतीची स्‍पंदने जाणवली. पू. होनपकाकांच्‍या सहस्रारचक्रावर काही वेळ हात ठेवल्‍यावर माझे ध्‍यान लागू लागले.

५. पू. होनपकाका यांच्‍या अंत्‍यविधीपूर्वी त्‍यांचे दर्शन घेतांना आलेल्‍या अनुभूती

५ अ. पू. होनपकाकांकडे पाहून पुष्‍कळ भावजागृती झाली.

५ आ. पू. होनपकाकांचा देहत्‍याग झाला असूनही ‘ते देहात आहेत’, असे जाणवल्‍याच्‍या आलेल्‍या अनुभूती

१. छातीकडे पाहिल्‍यावर ‘त्‍यांचा श्‍वास चालू आहे’, असे जाणवले.

२. त्‍यांच्‍या हातांची बोटे आणि चरणांची बोटे, विशेषतः अंगठे हलत असल्‍याचे जाणवले.

३. ‘ते डोळ्‍यांनी सर्व पहात आहेत’, असे जाणवले.

५ इ. पू. होनपकाका यांचे दर्शन घेतांना स्‍वतःमधील स्‍पंदनांमध्‍ये झालेले पालट !

येथे माझ्‍यातील स्‍पंदनांमध्‍ये जो पालट मला सूक्ष्मातून जाणवला, तशीच अनुभूती मला प्रत्‍यक्षातही आली. पू. होनपकाका यांचे दर्शन घेतल्‍यानंतर माझा भाव जागृत झाला. माझ्‍यातील आनंद वाढला, तसेच मला शांतही वाटू लागले.

५ ई. पू. होनपकाका यांच्‍यामधील स्‍पंदनांमध्‍ये झालेले पालट !

१. देहत्‍यागापूर्वी त्‍यांच्‍याकडून अधिक प्रमाणात आनंद प्रक्षेपित होत होता.

२. देहत्‍यागानंतर त्‍यांच्‍याकडून भाव, चैतन्‍य आणि आनंद हे तिन्‍ही घटक सम प्रमाणात वातावरणात प्रक्षेपित होऊ लागले.

३. संत आणि साधक यांनी त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेतल्‍याने   पू. होनपकाकांमधील ऊर्जा त्‍या वेळी कार्यरत झाली. त्‍यामुळे त्‍यांच्‍यातील शक्‍ती प्रक्षेपित होण्‍याचे प्रमाण वाढले. त्‍यांनी दर्शन घेणार्‍यांकडे चैतन्‍य प्रक्षेपित करण्‍याबरोबरच शक्‍तीही प्रक्षेपित केली.

४. शेवटी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. होनपकाकांचे दर्शन घेतल्‍यावर पू. काकांकडून शक्‍ती प्रक्षेपित होण्‍याचे प्रमाण न्‍यून होऊन आनंद प्रक्षेपित होण्‍याचे प्रमाण वाढले. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दर्शन घेतांना पू. होनपकाकांना नमस्‍कार केल्‍यावर मला जाणवले, ‘पू. काकाही पटकन उठून बसले आणि त्‍यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना नमस्‍कार केला.

५. शेवटी पू. होनपकाकांना अंत्‍ययात्रेसाठी नेत असतांना ‘त्‍यांच्‍या चेहर्‍यावरील आनंद वाढला आहे’, असे त्‍यांची मुलगी कु. दीपाली यांना जाणवले. तेव्‍हा आम्‍हीही बघितल्‍यावर आम्‍हालाही तसेच जाणवले. तेव्‍हा पू. काकांकडून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्मातील स्‍पंदनांवरूनही तसेच लक्षात आले.

५ उ. पू. होनपकाकांचा देह अंत्‍यदर्शनासाठी ठेवला असतांना त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित होणार्‍या पांढर्‍या धुरासारख्‍या लहरींच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती : मला ‘पू. होनपकाकांच्‍या संपूर्ण देहातून पांढर्‍या धुरासारख्‍या लहरी संथ गतीने प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले. या लहरी शक्‍ती आणि चैतन्‍य यांच्‍या (अनुक्रमे पृथ्‍वी आणि तेज तत्त्वांच्‍या) एकत्रित लहरी होत्‍या. या लहरी सूक्ष्म होत्‍या आणि सूक्ष्मातील कळणार्‍यांना त्‍या दिसू शकत होत्‍या.

पू. होनपकाका यांचा देह ठेवलेल्‍या स्‍थानी सभोवती निळ्‍या रंगाची कनात बांधली असल्‍याने पू. काकांच्‍या देहातून प्रक्षेपित होणार्‍या या धुरासारख्‍या लहरी स्‍पष्‍ट दिसत होत्‍या. साधक आणि संत यांनी दर्शन घेतल्‍यावर प्रक्षेपित होणार्‍या त्‍या लहरींमध्‍ये कसा पालट झाला, ते येथे देत आहे.

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०२२)

(क्रमश:)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक