साधकांनो, आपत्‍काळाच्‍या पूर्वसिद्धतेसाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक, तसेच संकेतस्‍थळांची ‘लिंक’ स्‍वतःकडे प्राधान्‍याने नोंद करून ठेवा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक

‘प्रतिदिन घडणार्‍या वाढत्‍या दुर्घटना, विविध आपत्ती इत्‍यादींद्वारे भीषण आपत्‍काळ अनुभवायला येत आहे. आपत्‍काळात व्‍यक्‍तीला कोणत्‍याही तात्‍काळ सेवेची आवश्‍यकता भासू शकते. यासाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील आणि स्‍थानिक स्‍तरावरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवांचे संपर्क क्रमांक सर्वांनी स्‍वतःकडे संरक्षित करून ठेवावेत, उदा. स्‍थानिक पोलीस ठाणे, रुग्‍णवाहिका, अग्‍नीशमन दल, रुग्‍णालये, रक्‍तपेढ्या, शारीरिक तपासणी केंद्रे (डायग्‍नोस्‍टिक सेंटर), ‘पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी’ इत्‍यादींचे संपर्क क्रमांक, तसेच त्‍यांच्‍या संकेतस्‍थळांची ‘लिंक’ यांविषयीची माहिती आपत्‍कालीन साहाय्‍याच्‍या दृष्‍टीने सर्वांकडे असणे महत्त्वाचे आहे.

वर नमूद केलेली सर्व अत्‍यावश्‍यक माहिती ‘जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्षा’त उपलब्‍ध असते. प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या जिल्‍हाधिकारी कार्यालयात हा कक्ष कार्यरत असतो. ही माहिती घेण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍ह्यातील उत्तरदायी साधकांनी पुढीलप्रमाणे नियोजन करावे.

१. उत्तरदायी साधकांनी आपापल्‍या जिल्‍ह्यातील १ – २ साधकांचे ‘जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्षा’ला भेट देण्‍याचे नियोजन करावे.

२. भेट देणार्‍या साधकांनी वर नमूद केलेली माहिती, अन्‍य सर्व आपत्‍कालीन संपर्क क्रमांक, आपत्‍कालीन यंत्रणांच्‍या संकेतस्‍थळांची ‘लिंक’ इत्‍यादी अत्‍यावश्‍यक माहिती जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन कक्षातून त्‍वरित घ्‍यावी.

३. ती माहिती ‘सॉफ्‍ट कॉपी’ किंवा छापील प्रत (प्रिंट) या स्‍वरूपात उपलब्‍ध असल्‍यास दोन्‍ही स्‍वरूपांत ती मिळण्‍यासाठी प्रयत्न करावा.

४. माहिती प्राप्‍त झाल्‍यानंतर ती जिल्‍ह्यातील सर्व साधक आणि धर्मप्रेमी यांना द्यावी. ‘सॉफ्‍ट’ किंवा ‘हार्ड कॉपी’मध्‍ये सर्वांना माहिती मिळाल्‍याची निश्‍चितीही करावी.

५. जिल्‍ह्यातील सर्व साधकांनी ही माहिती स्‍वत:चा भ्रमणभाष, तसेच भ्रमणसंगणक यांमध्‍ये संरक्षित करून ठेवावी. ही सर्व माहिती आपल्‍या कुटुंबातील सर्वांकडेच रहावी, या दृष्‍टीने सर्व माहिती वहीतही नोंद करून ठेवावी.

साधकांनो, आपत्‍काळात स्‍वतःचे आणि कुटुंबियांचे रक्षण होण्‍यासाठी योग्‍य क्रियमाण वापरून आवश्‍यक ती पूर्वसिद्धता वेळीच करून ठेवा !’

(२८.३.२०२३)