नवी मुंबई, १५ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने १६ एप्रिल या दिवशी खारघरमधील सेंट्रल पार्क येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून येणार्या भाविकांना जवळील रेल्वे स्थानकापासून कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी शासनाने विनामूल्य बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती एन्.एम्.एम्.टी.चे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी दिली. यासाठी विविध परिवहन उपक्रमाच्या १ सहस्र १०० बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने श्रीसदस्य आणि भाविक यांचे १५ एप्रिलपासून आगमन चालू झाले आहे. १५ एप्रिलला दुपारपासून ते १६ एप्रिलच्या रात्रीपर्यंत भाविकांना कार्यक्रमस्थळी, तर कार्यक्रम संपल्यानंतर रेल्वे स्थानकापर्यंत पोचवण्यात येणार आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या २००, बेस्ट उपक्रमाच्या ५००, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ३५०, कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या ५० बसगाड्या सीबीडी, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल या रेल्वे स्थानकांतून सोडण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक ते कार्यक्रम स्थळापर्यंत, तसेच पार्किंग ठिकाण ते कार्यक्रम स्थळावर ये-जा करण्यासाठीही बस सुविधा असणार आहे.
एन्.एम्.एम्.टी.च्या मार्गांवर प्रतिदिन धावणार्या बसगाड्यांमधूनच वरील कार्यक्रमासाठी बसगाड्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ आणि १६ एप्रिल या दिवशी प्रतिदिनच्या बस संचलनाच्या वेळापत्रकात अनियमितता येईल. त्यामुळे वरील दिवशी होणार्या गैरसोयीविषयी प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन योगेश कडूसकर यांनी केले आहे.