अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याची सिद्धता अंतिम टप्प्यात

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिग्गज नेते, तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा रविवार, १६ एप्रिल या दिवशी गोव्याच्या दौर्‍यावर येत आहेत. फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात दुपारी ४ वाजता होणार्‍या सभेत गृहमंत्री अमित शहा गोमंतकियांना संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्‍याची सिद्धता युद्धपातळीवर चालू असून ती अंतिम टप्प्यात पोचली आहे. १४ एप्रिलला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाला भेट देऊन सभेच्या सिद्धतेची पहाणी केली.

फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातील सभेच्या सिद्धतेचा आढावा घेतांना  प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे,  मंत्री गोविंद गावडे,  मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि  नरेंद्र सावईकर

देशातील सार्वजनिक निवडणुका केवळ एक वर्षावर आल्या आहेत. भाजपने या निवडणुकांचे रणशिंग यापूर्वीच फुंकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी राष्ट्रीय नेत्यांनी देशातील राज्यांचे दौरे चालू केले आहेत. भाजपचे संघटन निवडणुकीच्या कामाला लागले असून सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे. ३५० जागांचे लक्ष्य असलेल्या भाजपसाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. यामुळे गोव्यातील दोन्ही जागांवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्ते आणि नेते आतापासूनच कामाला लागले आहेत. गोव्यातील दौर्‍याकडे राजकीय विश्लेषकांसह नागरिकांचे लक्ष लागले असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला गोमंतकीय नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.

दक्षिण गोव्यातून अमित शहांच्या सभेला २५ सहस्र लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य

मडगाव – दक्षिण गोव्यातून या सभेला २५ सहस्र लोकांची उपस्थिती लावून शक्तीप्रदर्शन घडवून आणण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. या सभेत भाजप दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीसाठी एक प्रकारे प्रचाराचा नारळ फोडणार आहे. या सभेला गर्दी जमवण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, राज्यपातळीवरील नेते, दक्षिण गोवा पातळीवरील नेते, मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा यांसहित विविध मोर्चांचे नेते, पदाधिकारी सध्या दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दक्षिण गोव्यातील सर्व २० मतदारसंघांत नेते, आमदार यांच्या बैठका पार पडल्या आहेत. एकूण चांगला प्रतिसाद मिळत असून सभेला लोकांना नेण्यासाठी बसगाड्याही कमी पडणार अशी स्थिती असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.