श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

नुकताच एक प्रसंग वाचनात आला. त्यात दिले होते की, एका उपाहारगृहातील भिंतीवर वदनी कवळ घेता… हा श्‍लोक लिहिलेला. तेथे एक उच्चभ्रू हिंदु कुटुंब जेवायला आले होते. त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा (साधारण वय १२ वर्षे) होता. त्यांचे लक्ष त्या श्‍लोकाकडे गेले. आई-वडील त्याविषयी चर्चा करू लागले, वदनी कवळ घेता म्हणजे काय ?, नाम घ्या फुकाचे म्हणजे काय ? What is फुका ?, असे प्रश्‍न ते एकमेकांना विचारत होते. तो मुलगा आपल्या आई-वडिलांकडे उत्सुकतेने बघत होता. कदाचित त्यांच्या चर्चेतून त्या श्‍लोकाचा अर्थ आपल्याला समजेल, अशी त्याला भाबडी आशा असावी. आई-वडील इंग्रजाळलेले असल्याने त्यांना त्या श्‍लोकाचा अर्थ उमगलाच नाही. यातून महान भारतीय संस्कृती असलेल्या भारतात प्राथमिक टप्प्याचा; परंतु अत्यंत महत्त्वाच्या श्‍लोकाचाही अर्थ ठाऊक नसणे, हे गंभीर आणि धर्मशिक्षणाची अपरिहार्यता दर्शवणारे उदाहरण आहे.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीत जेवणापूर्वी वदनी कवळ घेता… हा श्‍लोक प्रत्येक जण आवर्जून म्हणायचा. त्यामुळे त्याचा अर्थही मुखोद्गत असायचा; पण सध्या हे संस्कारच नष्ट झाले आहेत. त्यामुळे श्‍लोक म्हणणे तर दूरच; पण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतांना ताटाला साधा नमस्कारही केला जात नाही. पूर्वीच्या काळी कराग्रे वसते लक्ष्मी… या श्‍लोकाने दिवसाचा प्रारंभ व्हायचा. आता बेड टीने होतो. श्‍लोक, प्रार्थना यांमुळे प्रत्येक जिवावर सात्त्विक संस्कार होतात. तो खर्‍या अर्थाने घडतो. सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाष यांच्या युगात सध्याच्या पिढीला श्‍लोक, प्रार्थना, तसेच विविध स्तोत्रे, भगवद्गीता हे ठाऊकच नाही. खरे तर या सर्व गोष्टी म्हणजे हिंदु धर्माची आधारशीला आहेत; पण धर्मशिक्षण नसल्याने ते लक्षातच येत नाही.

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे सर्वत्र इंग्रजीचे वातावरण आहे. इंग्रजी भाषेत बोलायला जीभ सहज वळते; पण संस्कृत उच्चारायला नकोसे वाटते. ही स्थिती पालटण्यासाठी धर्मशिक्षण देणे आणि धर्माचरण करणे, हाच पर्याय आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत. त्यातूनच आयुष्यभरासाठीची संस्कारांची शिदोरी त्यांना मिळेल हे निश्‍चित !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.