७.९.२०२२ या दिवशी दुपारी मी भावजागृतीचा प्रयत्न करण्यासाठी बसले असतांना काय प्रयत्न करावे ?, ते मला सुचत नव्हते. कोणता भावप्रयोग करावा ?, तेही माझ्या लक्षात येत नव्हते. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना आळवले आणि सूक्ष्मातून विचारले, हे गुरुदेवा, भावप्रयोगासाठी कोणते सूत्र घेऊ ?, ते तुम्हीच मला सुचवा. त्या वेळी त्यांनी मला बालपणापासूनच्या जीवनाविषयी आठवायला सांगितले. तेव्हा मी तसा प्रयत्न चालू केला. मला समजू लागल्यापासूनचे काही प्रसंग मला पद्यरूपात आठवू लागले. त्याविषयी पुढे दिले आहे.
१. मी अगदी लहान होते, तेव्हाचे प्रसंग आठवले आणि वाटले, देवाविण त्यात कुणी नव्हते ।
काय सुंदर ते जीवन होते ।
देवाविण त्यात कुणी नव्हते ॥
२. मी जरा मोठी झाले, शाळेत जाऊ लागले. तेव्हाचे जीवन आणि प्रसंग आठवून वाटले, ईश्वरापासून दूर गेले ।
मायेचे जाळे पसरले । त्यातच मी हरवून गेले ।
मायेत मी गुंतले । ईश्वरापासून दूर गेले ।
ईश्वराच्या परीक्षेत मी हरले ॥
३. नंतर माझे माध्यमिक शालेय जीवन चालू झाले. तेव्हाचे जीवन आठवून वाटले, साधनेचा गुरुमंत्र मज मिळाला ।
काळजी माझी आणि सर्वांची देवाला ।
आपत्काळरूपी संपत्काळ त्याने दिला ।
कोरोना काळात पुन्हा साधनेसी आरंभ झाला ॥
साधनेचा गुरुमंत्र मज मिळाला ।
गुरुचरणांचे महत्त्व तो रूजवू लागला ।
व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न चालू झाले ॥
४. कोरोना महामारीच्या काळात काही मास उलटल्यानंतरचे जीवनातील प्रसंग डोळ्यांपुढे आले. ते आठवून वाटले, गुरुमाऊली संगती आहे ।
काळ पालटला, मोठे दुःख (टीप) जीवनी आले ।
सारेच प्रयत्न ढासळून गेले ।
परि गुरुमाऊली संगती आहे ।
जाणीव ती सतत राहे ।
मन माझे चराचरात गुरुरूप पाहे ॥
टीप – वडिलांचे निधन
५. वडिलांच्या निधनाच्या कठीण प्रसंगाला केवळ गुरुकृपेनेच तोंड देता आले. नंतर मनाची झालेली स्थिती आठवून वाटले, गुरुविण नको मज काही ।
साधनेकडे मन वळले ।
मायेच्या चिखलात राहिनासे झाले ॥
नको इतर काही, गुरुविण नको काही ।
गुरुविण नको मज काही ॥
६. मी मनाच्या अशा अवस्थेत असतांना अकस्मात् जे घडले, ते आठवले आणि वाटले, गुरुमाऊलींनी तयांच्या चरणी स्थान मज दिले ।
गुरुमाऊलींनी अलगद उचलोनी आश्रमात आणले ।
चरणी तयांच्या शरण-स्थान मज दिधले ।
७. मी आश्रमात रहायला आल्यानंतरचे दैनंदिन जीवन आठवून वाटले, तळमळीने अंतरात गुरुमाऊलींचे दर्शन जाहले ।
आश्रमात आल्यावरी निशिदिनी मन तळमळले ।
परि अजूनी भगवंत मुरारी न भेटले ।
तळमळीने अंतरातून दर्शन जाहले ।
मज वेडीला नव्हते कळले ।
त्यांनी मजला कुशीतच होते घेतले ॥
मग पांडुरंग हरि गुरुरूपात सामोरी आले ।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तच मज केले ।
भावविश्वात स्थान त्यांनी दिले ।
भावसत्संगात मज बोलाविले ।
धन्य धन्य मज केले । धन्य धन्य मज केले ॥
कृतज्ञता । कृतज्ञता । कृतज्ञता ।
-कु. सायली रवींद्र देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)