(म्हणे) ‘मी जिवंत असेपर्यंत बस्तर जिल्ह्यात दारूबंदी होणार नाही !’ – छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांचे विधान

छत्तीसगड चे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

रायपूर (छत्तीसगड) – दारू प्यायल्याने कुणी मरत नाही, तर अधिक दारू  प्यायल्याने मरतात. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत बस्तरमध्ये दारूबंदी होणार नाही, अशी घोषणा छत्तीसगडचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांनी केले आहे. ते बस्तरच्या दौर्‍यावर आहेत. ‘वाईनचे सेवनही औषध म्हणून केले पाहिजे. त्यामुळे पिणारा बलवान होतो’, असेही ते म्हणाले.

१. कवासी लखमा यांचा या विधानाविषयीचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात ते ‘दारू प्यायली नाही, तर माझ्याकडून कामही होणार नाही’ असेही म्हणतांना दिसत आहेत.

२. कवासी लखमा पुढे म्हणाले की, नगरपालिकेसह एम्.एम्.डी.सी.ची खाण आणि इतर कारखाने येथे काम करणार्‍या कामगारांना दारू लागते. दारूमुळे वेदना विसरता येते. राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह आणि ब्रिजमोहन अग्रवाल यांना हे कळणार नाही; कारण त्यांनी उभ्या आयुष्यात एकदाही गोणी उचलली नसेल किंवा अवजड काम केले नसेल. विदेशातील १०० टक्के, तर बस्तरमधील ९० टक्के लोक दारूचे सेवन करतात. बस्तरमध्ये दारूबंदी कधीच होणार नाही. कारण येथे सांस्कृतिक कार्यक्रमातही दारूचे सेवन केले जाते आणि ही परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे.

संपादकीय भूमिका

असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?