भाजप कव्वालीच्या माध्यमातून सरकारची कामे मुसलमानांपर्यंत पोचवणार !

भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून ‘सूफी संवाद महाअधिवेशना’चे आयोजन !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – वर्ष २०२४ मध्ये देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मुसलमानांनी पक्षाला मते देण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाने ‘सूफी संवाद महाअधिवेशना’चे सिद्धता चालू केली आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भाजपमधील मुसलमान नेते केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री हे विविध दर्ग्यांना भेटी देऊन कव्वाली ऐकणार आहेत. कव्वालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा प्रचार केला जाणार आहे. मुसलमान बांधवांना कव्वालीच्या माध्यमातून सरकारची कामे मुसलमानांपर्यंत पोचवली जाणार आहेत.

या मोहिमेचा आरंभ उत्तरप्रदेशातून केला जाणार असून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या दर्ग्यांमध्ये कव्वालींचे आयोजन केले जाईल. या प्रकारचा प्रयोग भाजपकडून केला जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. भाजप या मोहिमेतून हा संदेश देऊ इच्छिते की, मुसलमानांची मते त्याच्यासाठी महत्वाची आहेत.

‘मन की बात’च्या उर्दू भाषेत प्रती वाटल्या जाणार !

भाजपने उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये ‘मन की बात’च्या उर्दू भाषेतील प्रती वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामच्या विद्वानांशी झालेली चर्चा यांचे उर्दूत भाषांतर करून त्या प्रतीही मदरशांमध्ये वाटल्या जाणार आहेत. यासह भाजपने उत्तरप्रदेशातील अल्पसंख्यांक मोर्चाचे कुँवर बासित अली यांनी ‘मन की बात’ या मोदींच्या १२ रेडिओ संवादांचे भाषांतर उर्दू भाषेत करून त्याचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • भाजपने मुसलमानांना कितीही जवळ केले, तरी ते भाजपला मते देणार नाहीत. त्यामुळे भाजपने हिंदूंना जवळ करून त्यांचा विश्‍वास संपादन केल्यास हिंदू भाजपला भरघोस मतांनी निवडून देतील, हे निश्‍चित !