तुर्भे – नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एन्.एम्.एम्.टी.) विद्यार्थ्यांच्या बसपास योजनेत पालट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. यामध्ये मासिक बसपासवर शाळा ते घर या ठिकाणापर्यंत कितीही वेळा त्या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे एन्.एम्.एम्.टी.च्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
मागील काही वर्षांपासून पास योजनेमध्ये विविध सवलती दिल्यामुळे विद्यार्थी बेस्ट उपक्रमाकडे आकृष्ट झालेत. त्यामुळे नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या बसपासच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी उपक्रमाचे आर्थिक उत्पन्न अल्प झालेले होते. यामुळे परिवहन उपक्रमाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मासिक बसपासच्या संख्येत वाढ होण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी दिली.
त्याचाच एक भाग म्हणून सद्यःस्थितीत चालू असलेल्या विद्यार्थी मासिक बसपास योजनेत घर ते शाळा आणि शाळा ते घर अशी दिवसातून एक फेरी प्रवास करण्यास सवलत आहे. या मासिक बस पासमध्ये विद्यार्थ्यांना असलेले एका फेरीचे बंधन काढून शाळेत ये-जा करणे. जादा तासिकांसाठी आणि शिकवणी यांसाठी ये-जा करण्यासाठी त्रैयमासिक बसपास प्रमाणे जादा फेर्यांचा प्रवास (नो पंचिंग) करण्यास सवलत दिल्यास लाभ होईल, हे लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बसपास सवलत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. मासिक पास योजनेमध्ये दिवसातून शाळेत ये-जा करणे, जादा तासिका आणि शिकवणीसाठी ये-जा करण्यासाठी सवलत असणार आहे. हा बसपास नो पंचिंग असेल.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही बसमार्गावर पूर्णपणे वातानुकूलीत बसगाड्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण बसगाड्यांच्या तिकीट दरानुसार मासिक बसपास शुल्क आकारून वातानुकूलित बसगाड्यांमध्ये प्रवास करण्यास २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ही सवलत घेता येणार आहे.