गोवा : आता शैक्षणिक वर्षाच्या शेवटी पाठ्यपुस्तके शाळेतच जमा होणार !

  • गोवा समग्र शिक्षा संस्थेचा निर्णय

  • पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर होणार शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सूचना आल्याने शाळाप्रमुखांकडून प्रश्न उपस्थित

पणजी – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य दिली जाणारी पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शाळेतच जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर बहुतांश वेळा वापरात नसतात. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच शाळा प्रमुखांनी मुलांकडून पाठ्यपुस्तके वर्गातच जमा करून घ्यावीत, जेणेकरून ती पुढील वर्षीच्या विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी देता येतील, असा निर्णय ‘गोवा समग्र शिक्षा’ या संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे.

‘गोवा समग्र शिक्षा’चे प्रकल्प संचालक एस्.एस्. घाडी यांनी ६ एप्रिल या दिवशी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांच्या प्रमुखांवर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पाठ्यपुस्तके गोळा करून संबंधित वर्गखोल्यांमध्ये साठवून ठेवण्याचे उत्तरदायित्व असेल. हीच पाठ्यपुस्तके जूनमध्ये शाळा चालू झाल्यावर नवीन मुलांसाठी वापरली जातील. ३१ मार्च या दिवशी शैक्षणिक वर्ष संपले आहे आणि वरील परिपत्रक ६ एप्रिल या दिवशी काढण्यात आल्याने शासकीय अन् अनुदानित शाळांच्या प्रमुखांनी या परिपत्रकाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

संपादकीय भूमिका

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा चांगला निर्णय आहे; मात्र आता शाळांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी जुनी पाठ्यपुस्तके नव्या वर्षातील मुलांपर्यंत पोचण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे !