दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चैत्र कृष्ण तृतीया (९.४.२०२३) या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

‘४.४.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ ने २५ व्या वर्षात पदार्पण केले. ‘सनातन प्रभात’ची प्रथम आवृत्ती असलेल्या ‘गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती’चा २४ वा वर्धापनदिन तिथीनुसार चैत्र कृष्ण तृतीया म्हणजेच ९.४.२०२३ या दिवशी साजरा होत आहे. त्या निमित्ताने खालील अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

खरेतर दैनिकासाठी पत्रकारिता क्षेत्रातील किंवा त्याविषयीचा अनुभव असणारी व्यक्ती आवश्यक आहे. प्रारंभी मी दैनिकाविषयीच्या सेवेला आरंभ केला. तेव्हा माझ्या पाठीशी कोणताही अनुभव नव्हता. माझा या क्षेत्रातील पुष्कळसा अभ्यासही नाही. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी दैनिकाविषयीच्या सेवा करत आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘ते साधकांना कसे घडवत आहेत ?’, याविषयीचे लिखाण कृतज्ञतापूर्वक देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीची सेवा अनेक वर्षे करूनही आमची साधनेत अपेक्षित प्रगती होत नसल्याने आणि आम्ही केलेल्या अनेक चुकांमुळे ‘सनातन प्रभात’मधील सात्त्विकता न्यून झाल्याने २०.५.२०२१ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातील अनेक चुका आमच्या लक्षात आणून दिल्या. प्रत्येक चूक ईश्वरापासून दूर नेते. त्यामुळे आमची प्रगती होत नव्हती. ‘प्रगती नाही तर नाही; पण निदान आणखी अधोगती तरी होऊ नये आणि साधकांची प्रगतीच व्हावी’, यांसाठी करुणाकर गुरुमाऊलीने ही स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केली.

१ अ. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतून अनेक दृष्टीकोन शिकायला मिळणे : ही प्रक्रिया प्रत्यक्ष विष्णुस्वरूप गुरुमाऊलींनी चालू केल्याने आम्ही त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच असेल. केवळ चुका दाखवून नव्हे, तर ‘चुका कशा सुधारायला हव्यात ? चुकांवर कोणते प्रायश्चित्त घेतल्याने चुकांचे गांभीर्य लक्षात येईल ? स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया किती आवश्यक आहे ? वरवरचे प्रयत्न का नकोत ?’, असे अनेक दृष्टीकोन या प्रक्रियेतून आम्हाला शिकायला मिळाले.

१ आ. साधकांची अंतर्मुखता वाढणे : दैनिकातील ‘शुद्धलेखन, व्याकरण, वाक्यरचना, मथळे, संकलन आणि संरचना’, यांविषयीच्या अनेक चुका दाखवतांना ‘योग्य काय असायला हवे ?’, हेही परात्पर गुरुदेवांनी शिकवले. त्यातूनच आम्हा प्रत्येक साधकाची अंतर्मुखताही वाढली.

२. साधकांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये झालेल्या विविध चुका

श्री. संतोष गांधी

२ अ. शब्दांच्या संदर्भात झालेल्या चुका : प्रारंभी दैनिकाचे पृष्ठ क्रमांक ६ आणि ७ यांची सेवा करतांना या चुका अधिक प्रमाणात व्हायच्या. परात्पर गुरु डाॅक्टरांनी प्रतिदिन संपूर्ण दैनिकात अनुमाने २० ते २५ अशा चुका दाखवल्या होत्या. एकदा तर त्यांनी ३८ चुका दाखवल्या होत्या. त्यांतील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. एका वृत्तामध्ये ‘चीन आणि पाक’ ऐवजी ‘भारत आणि चीन’, असे चुकीचे छापले होते.

२. एका संतांच्या वृत्तामध्ये दिनांक चुकीचा छापला होता.

३. एका लेखात ‘घरची मंडळी आमच्यात सहज मिसळायचे’, असे चुकीचे छापले. त्यामध्ये ‘मिसळायची’, असे हवे होते.

४. ‘आंब्याचा रस’ याऐवजी ‘आंब्याचा गर’, असे चुकीचे छापले.

५. ‘महिला खासदाराला ‘तो खासदार’, असे चुकीचे छापले.

६. एका लेखात ‘विजेचा गडगडाट’, असे चुकीचे छापले. त्या ऐवजी ‘कडकडाट’, असे हवे होते.

२ आ. वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचे अर्थ न लिहिल्यास परात्पर गुरुदेवांनी ते लिहिण्यास सांगणे : दैनिकात काही शब्दांचे अर्थ लिहिले नव्हते, उदा. दैवी बालकांच्या वेगळ्या नावांचे अर्थ, वाक्यांमधील काही वेगळ्या शब्दांचे अर्थ, उदा. ‘मंगळसूत्र वाढवले म्हणजे काय ?’ त्या वेळी ‘वाढवले’, या शब्दाचा अर्थ कशाला लिहायचा ? तो तर सर्वांना ठाऊक आहेच’, असे विचार माझ्या मनात असायचे. ‘समाजात ज्याला ठाऊक नसेल, त्याला ते शिकायला मिळेल’, अशी परात्पर गुरुदेवांसारखी तळमळ माझ्यात नव्हती. ‘मुलांची नावे (कु. अर्हिता (अर्हिता म्हणजे जिची उपासना किंवा पूजा केली जाते ती), चि. जयती (‘जयती’ या नावाचा अर्थ ‘विजय मिळवणारी’ असा आहे.)

चि. सिंहयानी (दुर्गा सप्तशतीत श्री दुर्गादेवीचे नाव ‘सिंहयानी’, असे आहे.) प्रसिद्ध केल्यावर त्या नावांचा अर्थ समाजाला समजावा’, असेही ते सांगायचे.

३. चुकांमुळे ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता न्यून झाल्याने साधकांच्या साधनेची हानी होणे

अनेक वेळा बोली भाषेत असलेले लिखाणच आमच्याकडून छापले जायचे. त्या वेळी ‘वाक्य कसे असायला हवे ?’, हेही आम्हाला समजत नव्हते. अशा अनेक प्रकारच्या चुका प्रतिदिन आमच्याकडून झाल्याने ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता न्यून होत गेली. दैनिकातून समाजाला अपेक्षित चैतन्य मिळू शकले नाही. त्यामुळे आमच्या साधनेची हानी झाली. ही हानी भरून काढण्यासाठी ‘प्रत्येक चुकीसाठी प्रायश्चित्त घेणे, स्वभावदोष-निर्मूलनाची घडी बसवणे, वृत्त किंवा दैनिकांच्या प्रती यांचे वाचन काळजीपूर्वक वाचणे’ इत्यादी प्रयत्न आम्ही चालू झाले.

४. आरंभीची मनाची स्थिती

४ अ. आरंभी मनातील विचार स्वतःच्या चुकांच्या समर्थनार्थ असणे : आमची स्थिती प्रतिदिन लज्जास्पद होत होती. प्रारंभीच्या काळात होणार्‍या त्याच त्याच चुकांमुळे आमच्या मनावर ताणही यायचा. प्रतिदिन दाखवल्या जाणार्‍या चुकांविषयी ‘एवढ्या बारीक-सारीक चुका का दाखवत आहेत ? अनेक वेळा दैनिकातील चुकीच्या शब्दांवरून ‘जो छापला, तो शब्द योग्यच आहे’, असे वाटायचे. अनेकदा मनातील विचार स्वतःच्या समर्थनार्थ असायचे. ‘कधी कधी प्रायश्चित्त कोणते घ्यायचे ? अभ्यास कसा करायचा ?’, असे प्रश्न मला पडायचे.

४ आ. चुकांविषयी पुष्कळ खंत वाटणे : काही वेळा ‘या चुकांसाठी जन्मोजन्मी प्रायश्चित्त घेतले, तरी यांतून सुटका होणार नाही’, असेही विचार माझ्या मनात यायचे. १ – २ साधकांना मी हे बोलूनही दाखवले. आमच्या चुका वाढल्या होत्या. आमच्याकडून साधे साधे शब्दही चुकायचे. परात्पर गुरुदेवांनी विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे देण्यासाठी त्यांनाच आमचा ३ – ४ वेळा पाठपुरावा घ्यावा लागायचा.

५. कृतीच्या समवेत ‘व्यष्टी साधनेचेही प्रयत्न झाले पाहिजेत’, याची जाणीव परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी करून देणे

प्रतिदिन पुष्कळ चुका होत असतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने झालेले प्रयत्न’, यांमुळे माझ्या मनावरील ताण दूर झाला. ‘आम्ही परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करण्यात न्यून पडलो’, याची जाणीव आम्हाला तीव्रतेने झाली. ही सेवा परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी केवळ कृतीच्या स्तरावर प्रयत्न अपेक्षित नाहीत, तर ‘व्यष्टी साधनेचेही प्रयत्न तेवढ्याच तळमळीने झाले पाहिजेत’, याचीही जाणीव परात्पर गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला करून दिली.

(क्रमशः)

– श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)