चिपळूण येथे नेत्रावती एक्सप्रेसमधील ‘पॅन्ट्री’च्या कर्मचार्‍यांनी ३ फेरीवाल्यांना केली अमानुष मारहाण

वेळीच कारवाई न झाल्यास जशास तसे उत्तर देणार ! – मनसे तालुका अध्यक्ष अभिनव भुरण

चिपळूण, ६ एप्रिल (वार्ता.) – नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ‘पॅन्ट्री’ विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी येथील ३ फेरीवाल्यांना अमानुष मारहाण केली आहे. या फेरीवाल्यांना ‘पॅन्ट्री’मध्ये कोंडून त्यांच्यावर उकळते तेल ओतण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांत तक्रार करणार्‍या फेरीवाल्यांनी दिली असून या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
‘अशा प्रकारे झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. या संदर्भात वेळीच कारवाई न झाल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल’, अशी चेतावणी फेरीवाले संघटना आणि मनसे तालुकाध्यक्ष अभिनव भुरण यांनी दिली आहे.


याविषयी अभिनव भुरण म्हणाले की, येथील मराठी फेरीवाले पोटापाण्यासाठी रेल्वेमध्ये काम करतात; मात्र परप्रांतीयांकडून त्यांना अमानुष मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सहन करणार नाही. फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणीविषयी प्रशासन, रेल्वे पोलीस आणि स्टेशन मास्तर यांना जाब विचारण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार होऊनही दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई किंवा त्यांचे अन्वेषण झालेले नाही. याविषयी उद्या ७ एप्रिलला या प्रकरणी कोणती कारवाई केली, याविषयी जाब विचारणार आहोत.