डोंबिवली येथे कोयता टोळीचा वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून धुडगूस !

  • दरवाजा तोडून घरात घुसण्याची धमकी

  • भीतीपोटी लोकांनी घराचे दरवाजे बंद केल

डोंबिवली – येथे १ एप्रिलच्या रात्री ५ जणांनी हातात कोयता घेऊन वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून धुडगूस घातला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास  मारण्याची धमकी त्यांनी वृत्त दांपत्याला दिली. जितू निशाद (वय ४० वर्षे) हा कोयता टोळीचा प्रमुख असून त्याच्या समवेत अन्य ४ गुंड होते. या कोयता टोळीविरुद्ध वृद्ध महिला बेबी मधुकर देसले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी देसले आणि त्यांचे आजारी यजमान घरात एकटेच होते. तेव्हा कोयता घेऊन आलेले हे गुंड त्यांच्या दरवाजावर लाथाबुक्क्या मारत आरडाओरडा करत होते. ‘दरवाजा न उघडल्यास तो तोडून घरात घुसू’, अशी धमकी गुंडांनी दिल्याने बेबी यांनी दार उघडले. त्यानंतर त्या सर्वांनी बेबी देसले यांना मारहाण केली, तसेच त्यांच्यावर कोयता उगारला. ‘आपल्याला ठार मारले जाईल’, या भीतीने बेबी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारी आणि पादचारी बेबी यांच्या घरात शिरले. त्या वेळी जितूने धमकी दिली की, तुम्ही मध्ये पडलात, तर तुम्हाला कोयत्याने मारू. त्यानंतर ते गुंड कोयता घेऊन रस्त्यावर नाचू लागले. ही टोळी घरात घुसेल, या भीतीपोटी रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले.

संपादकीय भूमिका 

यावरून गुंडांना कायद्याचे जराही भर उरले नसल्याचे सिद्ध होते ! पोलिसांना हे लज्जास्पद !