पुणे – १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष चालू होते. महापालिकेकडून मिळकतधारकांना नवीन देयके वाटपाचे काम १ एप्रिलपासूनच चालू होते; परंतु मिळकतकरातील ४० टक्के सवलत कायम ठेवण्याविषयी मंत्रीमंडळाने अद्याप निर्णय दिला नाही. त्यामुळे देयकांची छपाई थांबलेली आहे. देयके वितरण करण्यास विलंब होणार आणि त्यातून मिळकत कर भरण्यातील होणार्या विलंबामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटणार आहे. मिळकत देयके छपाई आणि वितरण करण्यास १ मास मुदतवाढ देण्यात आली आहे. देयके दिल्यानंतर २ मासांमध्ये मिळकत कर भरणार्यांना १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे पुढील सर्वच कृतींना विलंब होणार आहे.
महापालिकेकडून वर्ष १९७० पासून मिळकतधारक स्वत: रहात असल्यास ४० टक्के सवलत दिली जाते. यामुळे महापालिकेची आर्थिक हानी होत असल्याने महालेखा परीक्षकांकडून (कॅग) आक्षेप नोंदवण्यात आला होता. वर्ष २०१९ पासून ही सवलत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र नागरिकांकडून त्याला कडाडून विरोध होत आहे. ही सवलत रहित केल्यामुळे महापालिकेला १५० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.