डेन्‍मार्कमध्‍ये रमझानच्‍या काळात जाळण्‍यात आले कुराण !

इस्‍लामी देशांकडून निषेध !

कोपनहेगन (डेन्‍मार्क) – युरोपीय देश डेन्‍मार्कमध्‍ये पुन्‍हा एकदा कुराण जाळण्‍याची घटना घडली आहे. ‘पॅट्रियटर्न गेर’ नावाच्‍या संघटनेने कोपनहेगन येथील तुर्कीयेच्‍या दूतावासाबाहेर कुराण जाळले, तसेच तुर्कीयेचा राष्‍ट्रध्‍वजही जाळला. या संघटनेने या घटनेचे थेट प्रक्षेपण तिच्‍या फेसबुक खात्‍यावरून केले होते.

या घटनेचा तुर्कीये, सौदी अरेबिया, पाकिस्‍तान, जॉर्डन आदी इस्‍लामी देशांनी निषेध केला आहे. यावर्षी जानेवारी मासापासून स्‍विडन आणि डेन्‍मार्क येथे सातत्‍याने कुराण जाळण्‍याच्‍या घटना घडत आहेत. रासमस पलुदान नावाची व्‍यक्‍ती हे कृत्‍य करत आहे. तिच्‍याकडे दोन्‍ही देशांचे नागरिकत्‍व आहे. तुर्कीयेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे की, रमझानच्‍या पवित्र मासामध्‍ये केलेल्‍या कृत्‍यातून युरोपमधील इस्‍लामद्वेष किती टोकाला पोचला आहे, हे लक्षात येते.