प्रभु श्रीरामाच्‍या चरणी प्रार्थना करतांना त्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पांढरे शुभ्र रेशमी सोवळे नेसलेले चरण घट्ट धरून कळवळून प्रार्थना करणे आणि ‘ते चरण प्रभु श्रीरामाचेच आहेत’, असे जाणवणे

‘एके दिवशी सकाळी ११.४५ वाजता मी आश्रमसेवा झाल्‍यावर विश्रांती घेण्‍यासाठी खोलीत गेलो. मला पुन्‍हा दुपारी २ वाजता सेवेसाठी जायचे असल्‍यामुळे मी पलंगावर केवळ पडून होतो. दुपारी १ च्‍या सुमारास मला पुढील दृश्‍य दिसले – ‘मी पांढरे शुभ्र रेशमी सोवळे नेसलेले चरण घट्ट धरून कळवळीने प्रार्थना करत आहे. त्‍या सोवळ्‍याला सोनेरी किनार आहे. मी प्रार्थना करतांना पुष्‍कळ रडत आहे. त्‍या वेळी मला चरण दिसत नसून गुडघ्‍याच्‍या खाली घोट्यापर्यंतचाच भाग दिसला. तेव्‍हा मला ‘हे चरण प्रभु श्रीरामाचेच आहेत’, असे स्‍पष्‍टपणे जाणवले. ‘चरणांच्‍या बाजूला धनुष्‍याची खालची बाजू टेकवली आहे. ते धनुष्‍य सोनेरी असून त्‍याला लाल रंगाच्‍या रेशमी धाग्‍यात मोती ओवलेला सुंदर असा गोंडा आहे’, असेही मला दिसले.

श्री. सत्यकाम कणगलेकर

२. सोवळ्‍याच्‍या ठिकाणी पांढरा पायजमा दिसणे आणि ते चरण घट्‍ट धरून ईश्‍वराला कळवळून प्रार्थना करणे

थोड्याच वेळात मला त्‍या सोवळ्‍याच्‍या ठिकाणी पांढरा पायजमा असल्‍याचे दिसत आहे. हे दृश्‍य सतत पालटत होते. मला एकदा सोवळे आणि नंतर ते पालटून तिथे पांढरा पायजमा दिसत होता. असे पुष्‍कळ वेळ चालू होतेे. ‘हे सर्व घडत असतांनाही मी ते चरण घट्‍ट धरले आहेत आणि मला चरणांशी ठेवण्‍यासाठी ईश्‍वराला कळवळून प्रार्थना करत हुंदके देऊन रडत आहे’, असे मला जाणवत होते.

३. दृश्‍यात दिसल्‍याप्रमाणे प्रत्‍यक्षातही हुंदके देत भावाश्रू येणे

थोड्या वेळाने मी भानावर आलो आणि उठून पाहिले, तर घड्याळात दुपारचे १.४५ वाजले होते. मला जाणवणारी सर्व प्रक्रिया आणि दिसणारे दृश्‍य अनुमाने ४५ मिनिटे चालू होते. पूर्ण जाग आल्‍यावरही मला हुंदके येत होते आणि माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू वहात होते. माझी ही स्‍थिती पुढे अनुमाने ३० मिनिटे टिकून होती.

४. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्‍यावर ‘अनुभूती देणारे चरण त्‍यांचेच आहेत’, याची प्रचीती येणे

दुसर्‍या दिवशी मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी त्‍यांनी परिधान केलेला पांढरा पायजमा आणि त्‍यांचे चरण पाहिल्‍यावर ‘ज्‍या चरणांनी मला कालची अनुभूती दिली, ते हेच चरण आहेत’, याची मला गुरुदेवांनीच (परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी) प्रचीती दिली.’

– श्री. सत्‍यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक