(म्हणे) ‘डोकलाम वाद सोडवण्यामध्ये चीनची भूमिकाही महत्त्वाची !’ – लोटे शेरिंग, भूतानचे पंतप्रधान

भूतानच्या पंतप्रधानांनी चीनची बाजू घेण्याचा प्रयत्न !

लोटे शेरिंग

थिंपू (भूतान) – डोकलाम वाद सोडवण्यासाठी चीनची भूमिकाही समान महत्त्वाची आहे, असे विधान भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केल्याने भूतान चीनच्या बाजूने झुकत असल्याचे म्हटले जात आहे. भूतानच्या सीमेत चीनने घुसखोरी करून १० गावे वसवली आहेत, हे यापूर्वी प्रसिद्ध झालेले वृत्तही भूतानने फेटाळले होते. यावरून भूतानने चीनशी जवळीक निर्माण केल्याचे दिसून येत आहे. डोकलाम हा भाग भूतानच्या सीमेवर आहे.

१. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान शेरिंग पुढे म्हणाले की, समस्या सोडवणे एकट्या भूतानच्या हातात नाही. यात तीनही देश आहेत. त्यात कुणीही मोठा किंवा लहान नाही, ते समान आहेत आणि त्यांचा एक तृतीयांंश सहभाग आहे.

२. चीनने डोकलामजवळ भूतानच्या सीमेमध्ये गाव वसवण्यासह रस्ते बांधले आहेत. यामुळे भारताला या क्षेत्रात संरक्षणाच्या दृष्टीने आव्हान निर्माण झाले आहे. भारत डोकलाम भागात चीनच्या वाढत्या विस्तारवादी धोरणाला विरोध करत आला आहे. डोकलाम हा भूतानचा भाग असून भारत अनेक दशकांपासून भूतानचे सैनिकी स्तरावर संरक्षण करत आहे. वर्ष २०१७ मध्ये डोकलाममध्ये चीन आणि भारत यांचे सैनिक २ मास एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चीन येथे अवैधरित्या रस्त्यांची निर्मिती करत होता. त्याला भारताने विरोध केला होता.

संपादकीय भूमिका 

भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये काही चूक होत आहे कि चीन अधिक प्रभावी ठरत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !