राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचे प्रकरण
रत्नागिरी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
जिल्हा सरकारी अधिवक्ता अनिरुद्ध फणसेकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडली. त्यांनी पोलिसांनी केलेल्या अन्वेषणाची बाजू न्यायालयासमोर ठेवली. दोन तासाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळला.
६ फेब्रुवारी या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर कोदवली (राजापूर) येथील पेट्रोलपंपानजीक दुचाकीवरून जात असलेले पत्रकार शशिकांत वारिशे यांचा अपघात झाला. त्यात ते गंभीर घायाळ झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीला धडक देणार्या चारचाकी गाडीचा चालक पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली होती. प्राथमिक अन्वेषणानंतर त्याच्यावर भा.दं.वि.३०२ कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.