माझ्या सरकारचे यश सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कार्यक्रमाच्या आरंभी दीपप्रज्वलन करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्रीमंडळातील इतर सर्व मान्यवर

पणजी, २८ मार्च (वार्ता.) – माझ्या सरकारला मिळालेले यश हे संपूर्ण मंत्रीमंडळाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्राप्त झाले आहे, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने माहिती आणि प्रसिद्धी खात्याने पर्वरी येथील विधानसभा संकुलात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

वर्षपूर्ती कार्यक्रमात  मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रीमंडळातील सर्व सदस्य,  सभापती रमेश तवडकर आणि  भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे

डॉ. सावंत म्हणाले की, त्यांचे सरकार विविध योजना आणि उपक्रम यांच्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकियापर्यंत पोचले आहे. वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आल्यानंतर डॉ. सावंत यांनी याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. गोव्यातील जनतेला सुशासन देण्यासह मानवी विकास आणि पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून स्थिर सरकार देणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘गोवा की बात’ कार्यक्रम राबवणार ! – मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर गोवा सरकार ‘गोवा की बात’ कार्यक्रम राबवणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत मंत्रीमंडळातील एक मंत्री प्रतिमास तालुक्याच्या ठिकाणी भेट देऊन लोकांच्या तक्रारी ऐकून घेतील.

उत्तर गोव्यात लोकार्पण करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी डॉ. सावंत म्हणाले की, दाबोळी येथील विद्यमान विमानतळावर कोणताही परिणाम न होता नवीन सुविधा चालू करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघाचा विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने सरकारने ‘आमदार स्थानिक क्षेत्र विकास’ योजना चालू केली आहे. ‘स्वयंपूर्ण गोवा’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन  मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाला सभापती, उपसभापती, मंत्रीमंडळातील सर्व सदस्य, आमदार, भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि पत्रकार उपस्थित होते.