मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद
मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचा उपभोग आपण घेत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, अशा महान व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान केला जात आहे. सावरकरांचा राहुल गांधी वारंवार अपमान करत आहेत. राहुल गांधी यांनी केवळ १ दिवस सेल्युलर कारागृहात राहून दाखवावे, मग त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होईल. बाळासाहेब ठाकरे यांनी मणीशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती. ते धैर्य तुमच्यात आहे का ? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्यावर होणारा अवमानाचा जाहीर निषेध केला आहे.
शिंदे पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी सारखे म्हणतात, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तेवढा त्याग आणि देशाविषयी प्रेम असायला हवे. तुम्ही काय सावरकर होणार ? तुम्ही परदेशात जाऊन देशाची निंदा करता. परदेशात जाऊन देशाची निंदा करणे, हा देशद्रोह आहे. सावरकर देशाचे दैवत आहेत. या दैवताचा वारंवार अवमान होतो. सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही.’’
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अवमान होत असल्याने राज्यभर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येईल’, अशी घोषणा या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या सामाजिक संकेतस्थळांवरील ‘प्रोफाईल फोटो’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावले असून त्यावर ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले आहे.