माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती उघड
पणजी, २६ मार्च (वार्ता.) – ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद इनडोअर मैदानात भरवण्यात आलेल्या ‘मेगा जॉब फेअर’वर (नोकर भरती मेळाव्यावर) सरकारने २ कोटी ६१ लाख ४० सहस्र रुपये खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती मिळवली आहे.
Another RTI shocker: Rs 2.61 crores spent on Mega job fair https://t.co/ixhgWwHDi2 via @@goanewshub
— Goa News Hub (@goanewshub) March 26, 2023
या ‘मेगा जॉब फेअर’साठी ‘मेसर्स सनलाइट मिडिया’ या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापनाला २ कोटी ५१ लाख ४२ सहस्र २६० रुपये देण्यात आले असून विज्ञापनांसाठी ९ लाख २७ सहस्र ९९० रुपये, तसेच कदंब परिवहन महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या वाहनांवर ७५ सहस्र ७५४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘मेगा जॉब फेअर’संबंधीच्या धारिकेत केलेल्या नोंदीनुसार कामगार आयुक्तांनी १८ सप्टेंबर या दिवशी ताळगाव, मडगाव आणि फोंडा येथे ‘मेगा जॉब फेअर’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; परंतु कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी २२ सप्टेंबर या दिवशी ताळगाव येथेच रोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले. ‘मेगा जॉब फेअर’संबंधीच्या धारिकेत केलेल्या अन्य एका नोंदीनुसार कामगार आयुक्तांनी पत्राद्वारे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालकांना ६ सहस्र जणांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी खर्चाच्या अंदाजासह एका आस्थापनाचे नाव सुपुर्द करण्यास सांगितले. ‘मेगा जॉब फेअर’ला अवघे १० दिवस शिल्लक असतांना माहिती आणि प्रसिद्धी संचालकांनी पर्वरी येथील ‘मेसर्स सनलाइट मिडिया’ या आस्थापनाची निविदा सर्वांत अल्प म्हणजे २ कोटी ५१ लाख ४२ सहस्र २६० रुपये, तर ताळगाव येथील ‘विनायक डेकोरेटर्स’ची निविदा दुसर्या क्रमांकावर म्हणजे २ कोटी ५९ लाख ६० सहस्र रुपये असल्याचे कळवले. विशेष म्हणजे ‘मेसर्स सनलाइट मिडिया’ यांनी वस्तूनिहाय देयक कार्यक्रम झाल्यावर २ मासांनंतर म्हणजे १३ जानेवारी २०२३ या दिवशी सुपुर्द केले.
दरडोई ३ सहस्र ६०० रुपये अवास्तव खर्च
हा कार्यक्रम तातडीचा किंवा आणीबाणीच्या स्थितीचा नसतांनाही सरकारच्या आवश्यक आर्थिक संमतीविना आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर खर्च संमतीसाठी सरकारकडे आल्यावर वित्त विभागाने खर्चावर आक्षेप घेतला. प्रत्येक सहभागीवर ३ सहस्र ६०० रुपये खर्च अवास्तव आहे आणि त्यामुळे अनावश्यक वस्तू काढून टाकून दरडोई १ सहस्र ५०० रुपयांपर्यंत मर्यादित खर्च करावा, असे वित्त विभागाने सुचवले. कार्यक्रम पार पडल्यानंतर वित्त विभागाची ही सर्व निरीक्षणे समोर आली आहेत.
श्वेतपत्रिका काढा !
सामाजिक कार्यकर्ते अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स म्हणाले, ‘‘कागदपत्रांचे अवलोकन केल्यास स्पष्टपणे दिसून येते की, ‘मेगा जॉब फेअर’चे आयोजन हा महाघोटाळा होता.
Aires Rodrigues : महा रोजगार मेळाव्यावर 2.61 कोटी खर्च; आयरिश यांनी केला महाघोटाळ्याचा आरोप#Goanews #Marathinews #AiresRodrigues #Megajobfair #Dainikgomantak https://t.co/nZyWbZVcTj
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) March 26, 2023
बेरोजगारांना याचा कसा लाभ झाला ? याची सरकारने श्वेतपत्रिका काढावी आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करावी. सरकारच्या आर्थिक संमतीविना कार्यक्रम केल्याने संबंधितांवर कारवाई करावी.’’
‘मेगा जॉब फेअर’मध्ये सहभागी झालेल्या ५ सहस्र युवक-युवतींना आला नोकरीचा प्रस्ताव
पणजी – ‘मेगा जॉब फेअर’मध्ये सहभागी झालेल्यांपैकी ५ सहस्र युवक-युवतींना ‘फेअर’मध्ये सहभागी झालेल्या विविध आस्थापनांनी नोकरीचा प्राथमिक प्रस्ताव दिला. सरकारचा हा सर्वांत यशस्वी उपक्रम होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
Success: One out of five youth who visited Mega Job Fair was given an offer https://t.co/X6zfsVGxjb via @@goanewshub
— Goa News Hub (@goanewshub) March 26, 2023
सरकारी सूत्रांनुसार या उपक्रमाला युवक-युवतींनी भरघोस प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम आणखी एक दिवस वाढवण्यात आला. या ‘फेअर’मध्ये जहाजांवर नोकरी देणारी आस्थापने (क्रूझ लाईनर), विमानसेवेतील आस्थापने, औषधनिर्मिती प्रकल्प, हॉटेल व्यावसायिक, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, ‘बॅकिंग’, ‘रिअल इस्टेट’ आदी क्षेत्रांतील एकूण १७० आस्थापनांनी सहभाग घेतला, तर एकूण ४ सहस्त्र ८०० युवक-युवतींची विविध रोजगारांसाठी प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली. ‘फेअर’मध्ये सहभागी ५०० युवायुवतींना तात्काळ नोकरी देण्यात आली. या उपक्रमाला २५ सहस्रांहून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला.