दलाई लामा यांच्याकडून ८ वर्षीय मुलाला बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा नेता म्हणून घोषित !

दलाई लामांकडून ८ वर्षीय मंगोलियन मुलाला तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक नेता म्हणून घोषित

हिमाचल प्रदेश – बौद्ध धर्माचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांनी एका ८ वर्षीय मंगोलियन मुलाला तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक नेता म्हणून घोषित केले. यावेळी ६०० मंगोलियन बौद्ध त्यांच्या नव्या अध्यात्मिक नेत्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जुळ्या मुलांपैकी एक असलेल्या या मुलाला दलाई लामा यांनी बौद्धांचे एक धर्मगुरु खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म असल्याचे म्हटले जात आहे. बौद्ध धर्मगुरुंच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिले जाते.

२. धर्मगुरूंच्या पुनर्जन्माचा सोहळा हिमाचल प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. तिथेच दलाई लामासुद्धा राहतात. या सोहळ्यामुळे मंगोलियाचे शेजारी असलेल्या चीनचा संताप होण्याची शक्यता आहे. दलाई लामा यांनी वर्ष २०१६ मध्ये मंगोलियाचा दौरा केला होता, तेव्हा चीनने त्यांच्यावर टीका केली होती. चीन सरकारने म्हटले होते की, या दौर्‍यामुळे चीन-मंगोलिया संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला.