पाकमध्ये हिंदु दुकानदारांना मारहाण करणारा पोलीस अधिकारी निलंबित !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मागणीनुसार बिर्याणी बनवणार्‍या हिंदु दुकानदारांना पोलिसांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला निलंबित केल्याची घटना पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे घडली; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांचा दावा आहे की, ही घटना पाकच्या पंजाबमधील बहावलपूर येथील आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. या व्हिडिओवरून सिंध मानवाधिकार आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना पत्र लिहून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

१. हिंदु दुकानदार बिर्याणी बनवत असतांना पोलीस प्रमुख काबिल भायो येथे पोलीस कर्मचार्‍यांसह पोचला आणि त्याने रमझाननिमित्त उपवास करण्याऐवजी बिर्याणी बनवत असल्यावरून दुकानदार आणि त्यांचे वितरक यांना मारहाण करण्यास चालू केले. दुकानदाराने उपवास सोडण्यासाठी गिर्‍हाईकांकडून मागणी आल्याने बिर्याणी बनवत असल्याचे सांगितल्यानंतर काबिल भायो याने हिंदु दुकानदारांना हिंदु धर्मग्रंथांची शपथ घेण्यास भाग पाडले.

२. पाकचे माजी सरन्यायाधीश तसद्दुक हुसैन जिलानी यांनी १९ जून २०१४ या दिवशी पोलीस अधिकारी काबिल भायो याची वर्तणूक पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.