जागतिक मंदीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्व !

जगामध्ये सर्वत्र मंदीची लाट असतांना भारत मात्र सर्व देशांचे लक्ष वेधून घेत आहे. पुढील काळात भारत देश हा जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा असेल, असे भाकीत केले जात आहे. भारताला जागतिक स्तरावर कसे महत्त्व प्राप्त झाले आहे ? हे पुढील उदाहरणावरून लक्षात येते. ब्रिटीश संसदेतील सदस्य गॅरिथ थॉमस यांनी संसदेत विधान केले की, ब्रिटीश विद्यार्थ्यांना गुजराती, पंजाबी, बंगाली आणि उदूर्र् या भारतीय भाषा शिकवाव्यात. एका ब्रिटीश खासदाराला असे वाटते; याचे कारण म्हणजे पुढील काळात ब्रिटीश विद्यार्थ्यांना भारताशी चांगल्या पद्धतीने व्यवहार करता येईल. त्यांच्या दृष्टीकोनातून भारत ही पुढील जागतिक आर्थिक सत्ता असेल.

१. भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँक यांनी केलेले कौतुक

भारताविषयी आर्थिक क्षेत्रातील तज्ञही सकारात्मक आहेत. अमेरिकेच्या आर्थिक आणि सामाजिक खात्यात काम करणारे हमीद रशीद म्हणतात की, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे स्थान ठळकपणे दिसत आहे. भारताविषयी त्यांना वाटणारा हा विश्‍वास दोन कारणांसाठी आहे. एक म्हणजे दरवाढ (महागाई) रोखण्यात भारत यशस्वी झाला आहे आणि दुसरे म्हणजे अल्प आयात करण्याविषयीचे विधेयक  (लो इम्पोर्ट बिल). विशेषतः ऊर्जेच्या क्षेत्रातील व्यय भारताने कह्यात ठेवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याविषयी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आय.एम्.एफ्.) ही भारताकडे जागतिक अर्थव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे स्थान या दृष्टीकोनातून पहात आहे. जागतिक बँक म्हणते, जागतिक मंदीची परिस्थिती हाताळण्याविषयी इतर देशांपेक्षा भारत देश चांगल्या स्थितीत आहे. येथे लक्षात घ्यायला हवे की, आंतरराष्ट्रीय नाणे निधी किंवा जागतिक बँक भारताची शिफारस करत आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचे वातावरण आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. चीन वुहानमधील कोरोना विषाणूपासून सुटका करून घेत नाही, अमेरिका सरकारी दळणवळण बंदीच्या विरोधात झगडत आहे, जी ७ (विकसित राष्ट्रांची संघटना) देशांमधील इंग्लंडला जागतिक मंदीचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षी जपानची अर्थव्यवस्था थोडीशी घसरली. जागतिक बँक म्हणते, जगभरात आव्हानात्मक वातावरण असूनही भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये लवचिकता आहे.

२. सद्यःस्थितीत भारताची अर्थव्यवस्था चांगली असण्याची कारणे

पल्की शर्मा – उपाध्याय

२ अ. इंधनाचा वापर, भारतियांची क्रयशक्ती आणि करवसुली यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणे : भारताची अर्थव्यवस्था सध्याच्या स्थितीत चांगली असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. जागतिक मंदी असतांना भारत हा अपवाद का ठरला ? पहिली गोष्ट म्हणजे कोरोना महामारीच्या साथीतून भारत लगेच सावरला. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दळणवळण बंदी झाली नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार त्वरित चालू होऊन त्यात काही खंड पडला नाही. पश्‍चिमेला रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणात युरोपसह अन्य राष्ट्रांना फटका बसला; परंतु भारत हा धक्का सहन करू शकला. यासाठी भारतातील खासगी किंवा घरोघरी असणारा इंधनाचा वापर वाढल्यामुळे ही तफावत जाणवली नाही. भारताच्या जी.डी.पी.चा (सकल देशांतर्गत उत्पादनाचा) वापर ६० टक्के होता, म्हणजे तुम्ही आणि आम्ही जो पैसा खर्च करतो, त्यामुळे अर्थव्यवस्था वाढली. पैसा खर्च करण्याचे प्रमाण वाढल्याने अर्थव्यवस्था वाढण्यास साहाय्य झाले. याचाच अर्थ तुम्ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी खरेदी करत आहात, असे विनोदाने म्हटले, तरी ते खरे आहे. गेल्या मासात भारताच्या करवसुलीमध्ये वाढ झाली आहे. वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) वसूल होण्याचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे. ही वसुली १८ अब्ज डॉलर्सपेक्षा (१ सहस्र ४७७ कोटी रुपयांहून अधिक) थोडी अधिक आहे. करवसुली महत्त्वाची आहे; कारण करवसुली झाली म्हणजे आर्थिक व्यवहार बळकट झाले आहेत. ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.

२ आ. अनेक देशांनी चीनला पर्याय म्हणून भारतात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणे : दुसरे म्हणजे जगातील देश आता चीन देशाला पर्याय शोधू लागले आहेत. त्यांनी चीन अधिक एक, असे धोरण अवलंबले आहे, म्हणजे जर एखाद्या देशाची चीनशी भागीदारी असेल, तर समांतर तत्त्वावर दुसर्‍या देशाशी भागीदारी करणे. सारे जग आता त्यांना पुरवठा करणार्‍या साखळीमध्ये विविधता आणत आहे. व्यापार्‍यांवर होणारी कारवाई, सतत पालटणारी धोरणे, व्यापारी युद्ध आणि कामगारांची उपलब्धता न्यून होणे या सर्व कारणांमुळे जागतिक मंदीच्या या काळात चीनची विश्‍वासार्हता अल्प होत असून बहुतांश देश दुसरीकडे वळत आहेत आणि याचा भारताला लाभ होत आहे. उदा. गेल्या वर्षी अ‍ॅपल या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने नवीन आयफोन सिद्ध केला. याच्या उत्पादनासाठी अ‍ॅपल अनेक उत्पादकांना संधी देते. ही आस्थापने भारतात आपला व्यापार वाढवण्यासाठी सिद्ध आहेत. १२ हून अधिक आस्थापने त्यांचे उत्पादन चीनमधून इतरत्र नेण्यास सिद्ध आहेत. भ्रमणभाष जगातील दुसरे मोठे आस्थापन म्हणजे सॅमसंग. हे आस्थापन भारतात प्रत्येक वर्षाला १२० दशलक्ष युनिट्स सिद्ध करते. गूगल हे आस्थापनही आपला व्यवहार भारताकडे वळवण्याचा विचार करत आहे. सेमीकंडक्टरचे उत्पादन करणार्‍यांचे लक्ष आता भारताकडे वळले आहे. तैवानच्या फॉक्सकॉन या आस्थापनाने भारतातील वेदांता या आस्थापनाशी याविषयी भागीदारी केली आहे. त्यांना भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारायचा आहे. तैवानमधील चीप सिद्ध करणारी आस्थापने भारताबरोबर काम करण्यास सिद्ध आहेत. जागतिक व्यवहारासाठी योग्य स्थळ म्हणून भारताचे चित्र निर्माण होत आहे.

२ इ. भारतातील मोठ्या आस्थापनांनी देशातच पैसा गुंतवणे : तिसरी गोष्ट म्हणजे भारताची देशातील गुंतवणूक. भारतातील मोठी आस्थापने देशातच पैसा गुंतवत आहेत. सरकारकडून मिळत असलेल्या अनुदानामुळे ते आकर्षित होत आहेत. भारत सरकार महत्त्वाच्या, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स, ड्रोन्स, औषधे आणि बॅटरीज वगैरे १४ क्षेत्रांमध्ये उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक आस्थापने या संधीचा लाभ घेत आहेत आणि भारताची अर्थव्यवस्था वाढवण्यास साहाय्य करत आहेत. मॉगर्न स्टॅनली या गुंतवणूक व्यवस्थापन आस्थापनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०२७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर असण्याच्या वाटेवर आहे, असे म्हटले आहे. येत्या ४ वर्षांत भारत जपान आणि जर्मनी यांना मागे टाकेल. या आस्थापनाच्या अहवालानुसार वर्ष २०३० पर्यंत भारतामध्ये जगातील तिसर्‍या क्रमांकाचे स्टॉक मार्केट (समभाग विक्रीकेंद्र) असेल. तंत्रज्ञान आणि ऊर्जा यांमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीमुळे हे होणार आहे.

एस्. अँड पी. ग्लोबल या दुसर्‍या आस्थापनाने केलेल्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था जपान आणि जर्मनीला मागे टाकेल. भारतातील लोक जी २० देशांमध्ये सर्वाधिक व्यय करणारे असतील. जी २०चे या वर्षीचे अध्यक्षपद भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अजून नवीन संधी निर्माण करील.

३. भारताने वित्तीय तूट न्यून करण्यासह सावधपणे पावले उचलण्याची आवश्यकता

भारतापुढे काही समस्याही आहेत. भारताने काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. पहिली गोष्ट म्हणजे फिस्कल डेफिसिट, म्हणजे वित्तीय तूट. भारतात सरकार मिळकतीपेक्षा अधिक व्यय करते. त्यामुळे भारताच्या अर्थसंकल्पामध्ये शेवटी तूट रहाते. भारताची फिस्कल डेफिसिट ६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ती खाली येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे व्यय करण्यावर नजर ठेवावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे जागतिक अस्थिरता. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध याचे उदाहरण आहे. पाश्‍चिमात्य सत्ता रशियावर दबाव आणू पहात आहेत. ते तेलापासून मॉस्कोला मिळणारी मिळकत अडवू पहात आहेत. त्यामुळे भारताला सावधपणे पावले उचलावी लागतील. ऊर्जा स्रोतामध्ये कपात झाल्यास भारतावर त्याचा परिणाम होईल. या गोष्टी वगळता बाकी सर्व स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल आहे.

– पल्की शर्मा-उपाध्याय, व्यवस्थापकीय संपादक, फर्स्ट पोस्ट यू ट्यूब वाहिनी

(साभार : फर्स्ट पोस्ट यू ट्यूब वाहिनी)