लंडनमध्ये खलिस्तान्यांकडून पुन्हा उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन

पोलिसांवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या आणि अंडी !

लंडन (ब्रिटन) – येथील भारतीय उच्चायुक्तालयावर २० मार्च या दिवशी खलिस्तान्यांनी आक्रमण करून खिडक्यांच्या काचांची तोडफोड करण्यासह भारतीय राष्ट्रध्वज काढला होता. यानंतर २२ मार्च या दिवशी पुन्हा एकदा २ सहस्रांहून अधिक खलिस्तान्यांनी येथे येऊन आंदोलन केले; मात्र यापूर्वी येथे लंडन पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या वेळी खलिस्तान्यांनी पोलिसांवर शाई, पाण्याच्या बाटल्या आणि अंडी फेकली. या वेळी उच्चयायुक्तालयाच्या इमारतीवर मोठा राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, ब्रिटनमधील ‘फेडरेशन ऑफ सिख ऑर्गनायझेशन’ आणि वेगवेगळ्या शीख तरुणांच्या गटांनी हे आंदोलन आयोजित केले होते.

१. खलिस्तान्यांचे म्हणणे होते की,  आम्हाला पंजाबमधील आमचे कुटुंबीय आणि मित्र यांच्या सुरक्षेची चिंता आहे. राज्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबियांशी बोलू शकत नाही. इंटरनेट सेवा पूर्ववत् करण्यात यावी.

२. या आंदोलनावरून ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेम्स चतुराई यांनी म्हटले की, भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍यांवर होणारी आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत. मी माझे मत उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्यासमोर मांडले आहे. पोलिसांकडून चौकशी चालू असून आम्ही लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि भारत सरकार यांच्या संपर्कात आहोत. आम्ही शहर पोलिसांच्या साहाय्याने भारतीय उच्चायुक्तालयातील सुरक्षेचा आढावा घेत आहोत. उच्चायुक्तालयातील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते पालट करण्यात येणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • सातत्याने असे हिंसक आंदोलन करणार्‍या खलिस्तान्यांवर लंडन पोलीस कठोर कारवाई का करत नाही ? कि ब्रिटन सरकारची खलिस्तानवाद्यांना फूस आहे ?
  • ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशांचे आहेत; मात्र तरीही ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाची ही स्थिती आहे, हे परदेशातील भारतीय वंशांच्या लोकांचे ऊठसूठ कौतुक करणार्‍यांनी लक्षात घ्यावे !