महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र ! – एकनाथ शिंदे,  मुख्‍यमंत्री

प्रजासत्ताकदिनी चित्ररथाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणार्‍या कलावंतांचा सत्‍कार !

कलावंतचा सत्कार करतांना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – प्रजासत्ताक दिनानिमित्त देहली येथे कर्तव्‍य पथावरील संचलनात कलावंतांनी उत्‍कृष्‍ट कामगिरी सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्‍ट्रासाठी गौरवाची गोष्‍ट असून या चित्ररथाच्‍या सादरीकरणात सहभागी कलावंत कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद़्‍गार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राज्‍यशासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त देहली येथे राज्‍याचा ‘साडेतीन शक्‍तिपीठे : नारीशक्‍ती’ या चित्ररथाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणार्‍या, तसेच राज्‍यगीताची संगीतमय निर्मिती करणार्‍या कलावंतांचा सत्‍कार सोहळा २१ मार्च या दिवशी मंत्रालयातील प्रांगणात आयोजित केला होता. त्‍या वेळी ते बोलत होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते चित्ररथ निर्मिती कलावंत, चित्ररथासमवेत नृत्‍य करणारे कलांवत, राज्‍यगीताचे कलांवत आणि महाराष्‍ट्र वाद्यगीत सादर करणारे गायक आदींचा सत्‍कार केला.