भारताने ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या सुरक्षाव्यवस्था घटवली !

ब्रिटनला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी केली कृती !

ब्रिटीश उच्चायुक्तालय

नवी देहली – येथील ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या बहेरील बॅरिकेड्स (मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य) पोलिसांनी हटवले. काही दिवसांपूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने सुरक्षाव्यवस्थेत अशा प्रकारे घट करून ‘जशास तसे’ उत्तर दिले असून हा ब्रिटनला केलेला सांकेतिक विरोध असल्याचे बोलले जात आहे. ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या बाहेरील अन्य सुरक्षाव्यवस्था मात्र अबाधित आहे. ब्रिटीश उच्चायुक्तालयाला जी सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्यात बॅरिकेड्स लावणे, हा सुरक्षेचा पहिला टप्पा असल्याचे सांगितले जाते. ‘बॅरिकेड्समुळे दळणवळणाला अडचण येत होती; म्हणून ते हटवण्यात आले’, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ब्रिटीश उच्चायुक्तालयाने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. ब्रिटीश उच्चायुक्तालयाच्या समोर पोलिसांचे वाहन तैनात असते. तेही हटवण्यात आले आहे.