मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ साकारूया !

आज २१ मार्च या दिवशी असलेल्या जागतिक वनदिनाच्या निमित्ताने… 

पुढील वर्षी आपल्या देशात लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षांत देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला ‘मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा शासन स्तरावर काजू लागवड करण्यात येणार असल्याने, ‘हा मार्ग जगातील सर्वोत्तम बॉटनिकल कम् जैवविविधता महामार्ग होऊ शकतो’ हे वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास असलेल्या एका अस्सल कोकणी कृतीशील तज्ञाचे चिंतन आठवले आणि त्यामुळे जागतिक वनदिनाच्या निमित्ताने हा लेख येथे देत आहे.
– पत्रकार श्री. धीरज वाटेकर, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

महामार्गाच्या दुतर्फा केलेल्या लागवडीतून कोकणातील नष्ट होण्याच्या वनस्पतींचे संवर्धन

वर्ष २०११ पूर्वी मुंबई ते गोवा दरम्यानचा किमान प्रवास तेरा घंट्यांचा होता. या रुंदीकरण प्रकल्पाने तो १० घंट्यांचा आत येईल. भविष्यात हा महामार्ग मंगळुरूपर्यंत वाढेल. शासकीय जमीन उपलब्ध झाल्यास ‘लॉजिस्टिक पार्क’आणि ‘ट्रक टर्मिनल’ही उभारली जातील. या महामार्ग प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वगळता कोकणातील लोकप्रतिनिधींनी सक्षम पाठपुरावा केलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे. या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी अनेकदा उच्च न्यायालयाला, सरकारला आदेश द्यावे लागले आहेत. वर्ष २०१४ पासून २०२१ पर्यंत जवळपास ६ वेळा सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिनांक पालटल्यात. महामार्ग निर्मितीच्या काळात आजवर किमान ५ सहस्र प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू झालेत. मुंबई ते गोवा हा ४७१ किमी महामार्ग २०११ पासून ४ पदरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा मार्ग नवी मुंबईतील पनवेलला गोव्याशी जोडतो. पुढे तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधून थेट कन्याकुमारी आणि तमिळनाडू येथील केप कोमोरिन येथे संपतो. आम्ही ‘कोकण ते कन्याकुमारी’ प्रवास या रस्त्याने केलेला आहे. ‘सप्तकोकण’ संकल्पना समजून घेतली, तर हा सारा मार्ग आपल्याला जागतिक ‘बॉटनिकल’ हायवे करता येणे शक्य आहे. अर्थात् आपण तूर्तास मुंबई ते गोवा मर्यादित विचार करतो आहोत. आपल्या देशात ‘बोटॅनिकल गार्डन’ आहेत. तिथे वनस्पती या संशोधन आणि शिक्षणाच्या उद्देशाने वाढवल्या जातात आणि प्रदर्शित केल्या जातात. तमिळनाडूमधील उटीचे सरकारी बॉटॅनिकल गार्डन गुलाबांच्या प्रचंड संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ही भारतातील गुलाबाची सर्वांत मोठी बाग मानली जाते. जगातील सर्वात मोठे वटवृक्ष सांभाळणारे आचार्य जगदीशचंद्र बोस भारतीय वनस्पति उद्यान पश्चिम बंगालमधील शिबपूर, हावडा येथे आहे. निर्दयी मानवी विकृतींनी कितीही वृक्षतोड केली, तरी आजही पुरेशा पर्जन्यमानाच्या बळावर असंख्य निसर्गनवले प्रसवण्याची कोकणभूमीची क्षमता सर्वज्ञात आहे. चिपळूणचे प्रसिद्ध व्यापारी श्रीरामशेठ रेडीज यांनी त्यांच्या धामणवणे येथील ‘फार्महाऊस’वर ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेच्या साहाय्याने दोन एकरांत ‘मियावाकी’ जंगल तयार केले. येथे साडेतीनशे प्रकारची झाडे पहाता येतात. कोकणातील मातीची उगवणक्षमता यातून सिद्ध होते. तिला पाठबळ देऊन या महामार्गावर वृक्ष लागवडीस बळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वसामान्य मनात बॉटनिकल गार्डन म्हणजे एक अशी जागा जिथे आपण प्रवेश करताच आपल्याला एकाच ठिकाणी भूतलावरचे सर्वोत्तम सौंदर्य पहायला मिळते. ही संकल्पना विचारपूर्वक मुंबई- गोवा महामार्गाच्या दुतर्फा उपयोगात आणल्यास कोकणातील नष्ट होण्याच्या वनस्पतींचे संवर्धन करता येईल.

 

पत्रकार श्री. धीरज वाटेकर

वृक्षतोडीचा प्रचंड हव्यासामुळे कोकण महामार्ग बनला भकास !

जून २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप ते खारेपाटण दरम्यान वनसंज्ञेखालील संपादित करण्यात आलेल्या भूमीत दुतर्फा झाडे तात्काळ लावण्यात यावीत. अन्यथा महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम करण्यास अनुमती दिली जाणार नाही’, अशी नोटीस सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावली होती. शासनाच्या एका विभागाने काम करण्यासाठी शासनाच्याच दुसर्‍या विभागाला नोटीस पाठवण्याची घटना या प्रकल्पाने अनुभवली. भविष्यात वृक्षतोडीचा परिणाम कोकणच्या पर्यावरणावर होईल, वातावरण बिघडून सह्याद्रीत पडणार्‍या पावसाचे प्रमाण घटेल असे पर्यावरण तज्ञांकडून वारंवार सांगितले गेले आहे. हे प्रश्न उद्भवू नयेत, यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हरीत महामार्ग बनवण्याची घोषणा झाली होती. चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणार्‍या वृक्षांच्या तिप्पट झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्थानिक हवामानात वाढतील आणि भरपूर प्राणवायू सोडतील, अशा झाडांची निवड करण्यात येणार होती. प्रत्यक्ष लागवडीसाठी रस्त्याजवळच्या ग्रामपंचायतींची साहाय्य घेण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसर्‍या भागात मध्यम आणि तिसर्‍या टप्प्यात उंच वाढणारी झाडे अशा चढत्या क्रमाने लावल्यास ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार नाही. पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. असे सारे छान कागदोपत्री नियोजन होते. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमांत महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर अंतरावर ५८३ झाडे लावावीत असे नमूद आहे. त्यानुसार या महामार्गावर प्रति किलोमीटरला ५८३ झाडे म्हणजे त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्चित झाले होते. तर १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांतून जाणार्‍या महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर १३२६ झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे आहे. कोकणात मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन होणे गरजेचे असताना सध्या फक्त काजू लागवडीचा विषय पुढे येतो आहे. या महामार्ग रुंदीकरणात पहिल्या ८४ किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे २५ सहस्र वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. तर महामार्गाच्या मध्यवर्ती चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा या ४ तालुक्यांतील सुमारे ५५ सहस्र ८८९ झाडे तोडली गेली आहेत. चौपदरीकरणासाठी पोलादपूर तालुक्यात ६९७ वृक्ष तोडले गेलेत. सर्वाधिक वृक्षतोड कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि सुकेळी िखंड भागात झालेली असावी. जवळपास सर्व ठिकाणच्या वृक्षतोडीला किमान ८ वर्षांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणी आजही वृक्षारोपण झालेले नाही. कोकण रेल्वे प्रकल्पाप्रमाणे स्वतंत्र कार्यभार म्हणून या प्रकल्पाकडे न पहाणे आणि अधिकार्‍यांच्या वारंवार होणार्‍या बदल्या याचाही मोठा फटका या प्रकल्पाला बसलेला आहे. वृक्षतोडीमुळे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी थोडयाश्या विसाव्यासाठीही सावली शिल्लक राहिलेली नाही. पूर्वी हा हायवे झाडाझुडपांमुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला होता. खरंतर तो तसाच ठेवून सागरी महामार्ग अधिक सक्षम करणे किंवा सध्याचा प्रस्तावित नवा कोकण मार्ग निर्माण करणे शक्य होते; मात्र वृक्षतोडीचा अतिप्रचंड हव्यास कामी आला आणि कोकण महामार्ग भकास बनला. त्यातच कोकणात वणवे, चोरटी वृक्षतोड, प्राणीहत्यांनी इथल्या निसर्गाला रक्तबंबाळ करून सोडले आहे. ‘वृक्षप्रेमी’ जनता यावर पावसाळी लागवड-जतन आणि संवर्धन उपक्रमांची मलमपट्टी तरी किती लावणार ?

जागतिक ‘बॉटनिकल’ हायवेच्या माध्यमातून प्रायश्चित घेण्याची सुसंधी !

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात दुतर्फा वृक्षारोपण करण्याचे दायित्व केंद्र सरकारचे की राज्याचे ? यावरूनही यापूर्वी न्यायालयात चर्चा झाल्या आहेत. आज या महामार्गावरून प्रवास करतांना पूर्वीच्या अनेक पाऊलखुणा पुसल्या गेल्याच्या, असंख्य संजीवांची निवासस्थाने असलेले बडे वृक्ष भुईसपाट झाल्याच्या आठवणी मनाला छळतात, असंख्य वेदना देतात.

जागतिक ‘बॉटनिकल’ हायवेच्या माध्यमातून प्रायश्चित

वर्ष २०१८ मध्ये कणकवली शहरातील प्रसिद्ध पुरातन वड जमीनदोस्त झाला त्या सायंकाळी आम्ही दुर्दैवाने तिथे मुक्कामी होतो. शहरातील बसस्थानक आणि हॉटेल सह्याद्रीसमोरील या वटवृक्षाने मागील किमान शंभर वर्षात असंख्य पक्षांना आधार दिला होता. प्रवाशांना सावली दिली होती. त्या सायंकाळी अचानक जगण्याचा आधार हरवलेला पाहून दिवसभर फिरून परतलेली थकली-भागलेली पाखरे जीवाच्या आकांताने आकाशात घिरट्या घालताना पाहिली आणि त्या रात्री आमची जेवणाची इच्छाच मेली इतकी अस्वस्थता आली होती. निसर्गाविषयी विलक्षण आत्मियता बाळगणारी माणसे आपल्याकडे खूप आहेत. त्याच वेळी आपल्याकडे शहरा-शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या आडवी आलेली, विजेच्या तारांशी सलगी करू पाहाणारी, सर्वसामान्यांनी मायेनं वाढवलेली झाडी निर्दयतेने तोंडणारे स्थानिक प्रशासन आणि वीज कंपनीचे कर्मचारीही आहेत. आपल्याकडे असंख्य शहरातील भूजलपातळी दिवसेंदिवस कमालीची खालावते आहे. आपण शहरातून वास्तव्य करतांना ‘वृक्षकर’ भरूनही वृक्षसंस्कृती संपवत चाललो आहोत. रखरखत्या उन्हात आता नागोठणे जवळच्या वाकण नाक्यावरील वटवृक्षाची आठवणही सतावते. चिपळूणनजीक सावर्डे गावीही असाच पुराणवृक्ष उद्ध्वस्थ झाला. पूर्वीच्या कोकण महामार्गावर याच झाडांनी प्रवासी निवारा शेडची भूमिका बजावली होती. आम्ही करंट्यांनी ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा पद्धतीने शतकांचे साक्षीदार असलेल्या असंख्य पुराणवृक्षांचा निर्दयतेने बळी घेतला. मुंबई-गोवा जागतिक ‘बॉटनिकल’ हायवे या निर्दयतेचे प्रायश्चित करण्याची संधी ठरू शकते. आम्ही सर्वानी ती स्वीकारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा निसर्गशक्ती आपल्यावर सूड उगवल्याशिवाय रहाणार नाही.

वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जैवविविधता महामार्ग साकारणे शक्य !

मुंबई ते गोवा हा कोकण पर्यटन महामार्ग जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ट बॉटनिकल कम जैवविविधता महामार्ग’ साकारणे शक्य असल्याची संकल्पना आम्हाला ज्यांनी सांगितली त्या, आपल्या सुमारे १७ एकरच्या जंगलात २५ वर्षांच्या अविश्रांत कष्टातून जगातील विविध वनस्पतींचे जातिनिहाय वैविध्य फुलविणार्‍या, वनस्पतीशास्त्राचे कृतिशील तज्ञ आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डोळ्यांच्या हॉस्पिटलचे नेटवर्क उभारणार्‍या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना आम्ही याविषयीचे नियोजनही विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘मुंबई गोवा महामार्गाच्या ‘कशेडी ते खारेपाटण’ या रत्नागिरी जिल्हा हद्दीतील २०० किमी मार्गात वृक्ष लागवडीसाठी दुतर्फा ४०० किमी अंतर उपलब्ध आहे. साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक प्रजाती अशा पद्धतीने विचार केला, तर रत्नागिरी जिल्ह्यातील उपलब्ध ४०० किमी अंतरात आपल्याला विविध ४०० प्रजाती लावता येतील. इतक्या प्रजाती विचारपूर्वक जतन केलेला महामार्ग जगात कुठेही नाही आहे. प्रजातीची निवड करतांना कोकणातील डोंगराळ, सपाटीचा, उताराचा प्रदेश याचा विचार करून प्रत्येक २५ किलोमीटरच्या टप्प्यात एकाच झाडाच्या विविध प्रजातींची लागवड करणे आणि त्याच २५ किमीच्या पट्ट्यात एका ठिकाणी विशिष्ठ वर्तुळ करून त्याच झाडाची सर्वोत्कृष्ठ प्रजातीची लागवड करण्यासारख्या संकल्पना अमलात आणता येतील. यातून कोकण हायवे हा ‘जगातील पहिला बॉटनिकल हायवे’ तर होईलच; पण तो उत्कृष्ठ जैवविविधता महामार्गही होईल. असे झाल्यास जगातील असंख्य अभ्यासक, संशोधक हा हायवे पहायला येतील. वृक्ष लागवडीच्या एक किमीच्या मधल्या अंतरात आपल्याला काही ठिकाणी जाळयांचे कुंपण करून दुर्मिळ वेली, वनस्पती, फुलझाडे लावता येतील. अशा पद्धतीने आपण हजारभर प्रजातींचा हा महामार्ग उभा करू शकतो. काही ठिकाणी खाड्यांच्या परिसरात आपल्याला कांदळवनांच्या प्रजातींची लागवडही करता येईल; मात्र शासनाने काजूची झाडे कोकणातील मुंबई गोवा या पर्यटन महामार्गाच्या दर्शनी ठिकाणी अजिबात लावू नयेत. काजूच्या कलमांना १५-२० वर्षांहून अधिकचे आयुष्य नाही. ही झाडे दर्शनी खूप बोजड दिसतात. त्या झाडांचा कचरा खूप पडतो. त्याच्यावर रोगही लवकर येतो. या कारणांमुळे काजूची झाडे हायवेवर लावण्यातील शासकीय गुंतवणूक वाया जाण्याचा धोका आहे. त्यामुळे कोकण पर्यटन महामार्ग साकारतांना आपल्याला ‘जगातील पहिला बॉटनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता महामार्ग’ साकारण्याची, वृक्षसंवर्धनाची खूप मोठी संधी आहे. हा विचार करून सर्वांनी एकत्र येऊन महामार्गाच्या टप्प्यातील गावातील वृक्षरक्षकांचे गट करून, मार्गावरील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, ग्रामपंचायती आदींना अनुदान किंवा मानधनासह दायित्व दिल्यास शासनाच्या वृक्ष लागवडीच्या बजेटमध्ये जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ठ बॉटनिकल कम जैवविविधता महामार्ग’ साकारणे शक्य आहे.’

(सौजन्य : Kokan Club) 

‘एकच लक्ष्य दुतर्फा वृक्ष’ हा भविष्यातील वृक्षसंवर्धन मंत्र होणे आवश्यक !

राजापूर तालुक्यातील तळवडे गावी संपन्न झालेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनावरून परततांना आठवणीने आम्ही विशेष आग्रहावरून आवर्जून, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना त्यांच्या भांबेड गावी जाऊन भेटलो होतो. जागतिक दर्जाची वैशिष्ट्य सांभाळणारी त्यांची बाग फिरतांना बोलण्याच्या ओघात सरांनी आमच्याजवळ मुंबई गोवा हायवे हा ‘जगातील पहिला बॉटनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता महामार्ग’ होऊ शकतो ही भूमिका बोलून दाखविली होती. कोकणभूमीत हे होणे शक्य असल्याने हा जगातील असा पहिला हायवे ठरेल, असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत त्यांनी कोकणातील काही लोकप्रतिनिधींशी चर्चाही केली होती. जागतिक वनदिनाच्या पार्श्वभूमीवर, कोकणातील या महत्त्वाच्या हायवेच्या दुतर्फा ‘काजू फळपिक विकास योजना’ अंतर्गत काजू लागवड केली जाणार असल्याचे वृत्त वाचनात येताच आम्हाला हे सारे लिहावेसे वाटले. करमळसारखे (एलिफंट अँपल)अनेक देशी आणि कोकणच्या मातीशी नाते सांगणारे वृक्ष आज कोकणातून गायब झालेले आहेत. अशा सार्‍या दुर्मिळ वृक्षांची जाणीवपूर्वक जोपासना करण्याचे अभियान पुढील काळात कोकण महामार्गावर उभे राहिल्यास ‘जगातील पहिला बॉटनिकल हायवे कम् जैवविविधता महामार्ग’ अशी एक वेगळी ओळख या कोकण पर्यटन महामार्गाला मिळवून देता येणे सहज शक्य आहे. यासाठी ‘एकच लक्ष्य दुतर्फा वृक्ष’ हा भविष्यातील मुंबई-गोवा महामार्गाचा वृक्षसंवर्धन मंत्र व्हायला हवा आहे.