चंडीगड – खलिस्तानी संघटना ‘वारिस पंजाब दे’चा (‘पंजाबचे वारसदार’चा) प्रमुख अमृतपाल सिंह याला पंजाब पोलिसांनी जालंधर येथील नकोदरा भागात पाठलाग करून अटक केल्याचे वृत्त १८ मार्च या दिवशी सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. याला पोलिसांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता आणि ते फेटाळण्यातही आले नव्हते; मात्र ‘अमृतपाल याला अद्याप अटक झालेली नसून तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत’, असे सांगण्यात येत आहे; मात्र याविषयी कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात येत नसल्याने संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाब पोलिसांनी अमृतपाल याच्या ७८ सहकार्यांना आतापर्यंत अटक केली आहे. तसेच राज्यातील इंटरनेट बंद करण्यासह काही भागांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.
(सौजन्य : India Today)
पंजाब पोलिसांचा दावा आहे, ‘अमृतपाल याला शेवटी दुचाकीवरून पळून जातांना पहाण्यात आले.’ या संदर्भात अमृतपाल याचे वडील तरसेम सिंह यांनी सांगितले, ‘मला स्वतः ठाऊक नाही की, माझा मुलगा कुठे आहे.’ पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथील अमृतपाल याला अर्थपुरवठा करणारा दलजित सिंह कलसी याला अटक केली आहे.