औरंगजेबाच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ : कोल्हापूर जिल्ह्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद !

कोल्हापूर – हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथे महंमद युनूस मोमीन आणि मिणचे येथील फैजान सौदागर यांनी स्वतःच्या भ्रमणभाषच्या ‘स्टेटस्’वर ‘औरंगाबाद’ शहराच्या नामांतराच्या विरोधात, तसेच क्रूरकर्मा औरंगजेबाच्या समर्थनार्थ व्हिडिओ प्रसारित केला. या प्रकरणी दोघांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पहिल्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सावर्डे ते वडगाव पोलीस ठाणे अशी फेरी काढून महंमद याच्यावर देशविरोधी कलमे लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली, तर दुसर्‍या प्रकरणातही मिणचे गावात हिंदुत्वनिष्ठांनी फेरी काढून फैजान सौदागर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

याप्रकरणी वडगाव शहर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन’ला निवेदन दिले असून ‘महंमद आणि फैजान या दोघांचे वकीलपत्र घेऊ नये’, अशी मागणी केली आहे. यावर भाजपचे धनंजय गोंदकर, युवा सेनेचे अनिल माने, मनसेचे प्रवीण माने, शिवसेनेचे सुनील माने, राजू कवठेकर, बजरंग दलाचे किरण पुरोहित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र बुरुड यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

(स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर प्रसारित केलेले चित्र किंवा मजकूर)

संपादकीय भूमिका

औरंगजेबाचे समर्थन करणार्‍यांनी ‘औरंगजेबी कृत्ये’ करू नयेत, यासाठी त्यांच्यावर आताच कठोर कारवाई करा !