‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ या हिंदी चित्रपटावर नॉर्वेच्या राजदूतांचा आक्षेप !
नवी देहली – ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर भारतातील नॉर्वेचे राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी ‘ही केवळ काल्पनिक कथा आहे. या चित्रपटात नॉर्वेच्या प्रशासनाशी संबंधित गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. ‘मला आशा आहे की, भारतीय लोक समजुतीने वागतील आणि या चित्रपटात दाखवलेल्या कथनकाने प्रभावित होणार नाहीत’, असे म्हटले आहे. आशिमा छिब्बर या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर अधारित आहे. या चित्रपटात ‘एक भारतीय आई तिच्या लहान मुलांना नॉर्वेतील कायद्यांच्या पेचातून बाहेर काढण्यासाठी देशाची व्यवस्था आणि प्रशासन यांवर कशी मात करते ?’, हे दाखवण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये लहान मुलांना स्वावलंबी होण्यासाठी रात्री आई-वडिलांसमवेत न झोपवण्याविषयी बरेच कायदे आहेत. काही वर्षांपूर्वी एका भारतीय दांपत्यावर त्यांनी मुलाला समवेत झोपवल्याने कारवाई करण्यात आली होती.
‘Mother’s love in Norway no different from mother’s love in India’: Norwegian ambassador says Rani Mukerji’s ‘Mrs Chatterjee vs Norway’ has ‘factual inaccuracies’https://t.co/E6Nz7z8Li2
— OpIndia.com (@OpIndia_com) March 18, 2023
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड म्हणाले की, चित्रपटात नॉर्वेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. या कथेत नॉर्वेविषयीची तथ्ये पूर्णपणे चुकीची आहेत. चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. अधिकृतपणे नॉर्वेची बाजू घेणे आणि तथ्ये दुरुस्त करणे मला आवश्यक वाटते. चित्रपट रंजक बनवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक स्वातंत्र्य घेण्यात आले आहे. चित्रपट पाहिल्यावर असे दिसते की, या प्रकरणात दोन्ही देशांमधील सांस्कृतिक भेद, ही सर्वांत मोठी समस्या होती; पण वास्तविक तसे नाही. प्रकरणाचा तपशील न सांगता मी असे म्हणू शकतो की, चित्रपटात दाखवलेल्या मुलांना एकाच पलंगावर झोपवल्यामुळे किंवा त्यांना हाताने खाऊ घातल्याने त्यांना अन्यत्र पाठवण्यात आलेले नाही. या प्रकरणात किंवा इतर कोणत्याही प्रकरणात तसे झालेले नाही. नॉर्वेची संस्कृती चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नाही. आम्ही आमच्या मुलांनाही आमच्या हाताने खाऊ घालतो. मी स्वतः माझ्या मुलांना झोपतांना गोष्टी सांगतो. जेव्हा आमचे भारतीय मित्र हा चित्रपट पहातील, तेव्हा ते आमची संस्कृती आणि आमच्याविषयी काय विचार करतील ?, असा प्रश्न मनात उपस्थित होतो.