रत्नागिरी नगर परिषदेची पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाई !

 ६५ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडल्या

 ५५ टक्के पाणीपट्टीची वसुली

रत्नागिरी – येथील नगर परिषद प्रशासनाने पाणीपट्टी थकवणार्‍यांवर कठोर कारवाई चालू केली आहे. आतापर्यंत ६५ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.  ‘नागरिकांनी वेळीच पाणीपट्टी भरून नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करावे आणि  कारवाई टाळावी, असे आवाहन अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे. आतापर्यंत थकित असलेली ५५ टक्के पाणीपट्टीची वसुली नगर परिषदेने केली आहे.

शहरातील अनुमाने ९ सहस्र ५०० नळ जोडणीधारकांकडून नगर परिषदेला प्रतिवर्षी अडीच ते ३ कोटी रुपयांचा कर मिळतो; मात्र मागील २ वर्षे कोरोना महामारी कालावधीत ही थकबाकी वाढली होती. ही पाणीपट्टी ४ कोटी रुपयांपर्यंत थकित आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवलेल्या ५४ जणांवर नळजोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. ‘१५ दिवसांत थकबाकी भरा’, अशी नोटीस पाठवूनही नागरिकांनी थकबाकी न भरल्यामुळे १७ मार्चपासून पुन्हा नगर परिषदने पुन्हा कारवाई चालू केली आहे. थकित असलेल्या ११ नळजोडणीधारकांची जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. प्रशासनाची ही कारवाई अशी पुढे चालू रहाणार आहे.

सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी नगर परिषदेचे कार्यालय चालू रहाणार

येथील नगर परिषदेने मालमत्ता आणि पाणीपट्टी करदात्यांना आवाहन केले आहे की,  १९, २५, २६ आणि ३० मार्च या सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी नगर परिषदेचे कार्यालय चालू रहाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक करदत्यांनी करभरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांनी केले आहे.