प्रत्येक मदरशात सामवेद शिकवला पाहिजे ! – चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी

इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे केले उर्दूमध्ये भाषांतर !

इक्बाल दुर्रानी

नवी देहली – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. याविषयी दुर्रानी म्हणाले की, मदरशांत सामवेद शिकवला पाहिजे. यामुळे मुलांना योग्य काय आणि अयोग्य काय ?, हे लक्षात येईल. सामवादाचे भाषांतर केलेले हे पुस्तक सर्वसामान्य मुलांना समजावे, यासाठी ते सचित्र बनवण्यात आले आहे. या पुस्तकाचे डिजिटल (संगणकीकृत) रुपही येणार असून ते ‘यू ट्यूबवर’ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती भ्रमणभाष आणि भ्रमण संगणक (लॅपटॉप) यांवर वाचू शकते.

हे पुस्तक लिहिण्यासाठी मी चित्रपट बनवण्याचे काम थांबवले होते, असेही दुर्रानी यांनी या वेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, या पुस्तकाचे भाषांतर करणे, हे वाळूच्या समुद्रात पोहण्यासारखे आहे. हे पुस्तक धार्मिक एकतेचे प्रतीक आहे. ४०० वर्षांपूर्वी दारा शिकोह यांनी ५२ उपनिषदांचे भाषांतर केले. त्यांना वेदांचेही भाषांतर करायचे होते; मात्र त्यांचा भाऊ औरंगजेबने त्यांची हत्या केली. त्यांचे कार्य मी पूर्ण करत आहे. हे पुस्तक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मी सर्वत्र फिरणार आहे.