संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६४

‘संप्रेरकांचे (हॉर्मोन्‍सचे) असंतुलन ही आताच्‍या काळात भेडसावणारी पुष्‍कळ मोठी समस्‍या आहे. स्‍थूलपणा, मधुमेह, थायरॉयड ग्रंथीसंबंधी विकार, स्‍त्रियांचे मासिक पाळीसंदर्भातील विकार इत्‍यादी रोग संप्रेरकांच्‍या असंतुलनाचे दृश्‍य परिणाम आहेत. विविध संप्रेरके शरिरामध्‍ये ठराविक वेळी ठराविक कार्य करत असतात. शरीरयंत्रणा सुरळीत चालण्‍यासाठी त्‍यांचे कार्य योग्‍य रितीने होणे अपेक्षित असते; परंतु आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते.

निसर्गामध्‍ये चंद्रसूर्यांच्‍या गतीनुसार घटनाक्रमांचे एक चक्र असते. रात्र संपल्‍यावर दिवस होणे, विविध ऋतूंमध्‍ये वातावरणात विविध पालट होणे, हे या गतीमुळेच होत असते. या गतीचे शरिरातील संप्रेरकांच्‍या कार्यावरही परिणाम होत असतात. आपले जीवन निसर्गाच्‍या चक्राच्‍या जेवढे जवळ असेल, तेवढे शरिरातील संप्रेरकांच्‍या कार्याचे चक्र चांगल्‍या रितीने चालू रहाते.

वैद्य मेघराज पराडकर

चंद्र आणि सूर्य स्‍वतःच्‍या मनाला वाटेल त्‍याप्रमाणे कार्य करत नाहीत. त्‍यांच्‍या कार्यात एक शिस्‍त असते. रात्री लवकर झोपणे, सकाळी लवकर उठणे, नियमित व्‍यायाम करणे, पोट साफ होऊन सडकून भूक लागल्‍यावरच सकाळचा पहिला आहार घेणे, दुपारी न झोपणे या कृती आपण नेमाने करत राहिलो, तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते. यासाठी ‘स्‍वयंशिस्‍त’ गुण अंगी असणे महत्त्वाचे आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)