(म्‍हणे) ‘बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांच्‍या वसई येथील कार्यक्रमाला अनुमती देऊ नका !’

काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांची मागणी

काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराज यांचा वसई-विरार येथे १८ आणि १९ मार्च या दिवशी एक कार्यक्रम होत आहे. त्‍यांनी आपले साधू, संत आणि जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचा अवमान करणारे विधान करून लाखो वारकर्‍यांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत. त्‍यांच्‍या कार्यक्रमाला राज्‍य सरकारने अनुमती देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १६ मार्च या दिवशी दिलेल्‍या निवेदनाद्वारे केली आहे.

नाना पटोले यांनी निवेदनात म्‍हटले आहे की, महाराष्‍ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्‍य आहे. अंधश्रद्धेला आपल्‍या राज्‍यात अजिबात थारा नाही. महाराष्‍ट्राने तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या, तसेच संत तुकाराम महाराज यांचा अवमान करणारे पंडित धीरेंद्र शास्‍त्री महाराजांच्‍या होणार्‍या कार्यक्रमाला अनुमती दिल्‍यास जनतेची दिशाभूल करून त्‍यांच्‍या भावना आणि श्रद्धा यांच्‍याशी खेळ मांडला जाऊ शकतो.