पेटलिंग जया (मलेशिया) – चर्च, मंदिरे यांसारख्या मुसलमानेतर धार्मिक ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना मुसलमानांना उपस्थित रहाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सेलांगॉरचे धार्मिक व्यवहार विभागाचे कार्यकारी अधिकारी झवावी अहमद मुघनी यांनी ही माहिती दिली.
(सौजन्य : Free Malaysia Today)
सहिष्णुता वाढवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे झवावी यांनी स्वागत केले आहे. या कार्यक्रमांमध्ये सेलांगॉर इस्लामिक धार्मिक विभागाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असे झवावी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. धार्मिक उपक्रम आयोजित करू इच्छिणार्या संस्थांनी कोणताही अपसमज पसरू नये, यासाठी अधिक संवेदनशील रहाण्याची आठवण त्यांनी करून दिली. याविषयी स्पष्टीकरणसाठी मुसलमानेतर संस्थांनी इस्लामिक धार्मिक व्यवहार विभाग किंवा राज्य मुफ्ति यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘इम्पॅक्ट मलेशिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी क्लांग येथील चर्चला दिलेल्या भेटीविषयीच्या फलकावरून तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ख्रिस्ती नसलेल्या लोकांनी चर्चला भेट देण्याचे आवाहन या फलकाद्वारे करण्यात आले होते. त्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना झवावी यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले. या कार्यक्रमात मुसलमान तरुण सहभागी झाले नव्हते, असे मलेशियाचे मंत्री हन्ना योह यांनी सांगितले.